Breaking News

आम्ही समजदार, घेऊ काळजी पण तुम्ही द्या परवानगी

बेलापूर नाभिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा निषेध
बेलापूर/प्रतिनिधी 
येथे आज सकाळी नाभिक महामंडळाच्या आदेशानुसार स्थनिक नाभिक संघटनेने महाराष्ट्र सरकारचा जाहिर निषेध  केला. सोशल डिस्टंसिंगचे पालन करत प्रत्येक नाभिक दुकान चालकाने स्वतःच्या दुकानासमोर हातात निषेधाचे फलक घेऊन व काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला.
यावेळी त्यांच्या हातातील निषेधाच्या फलकावरील वाक्ये लक्ष वेधून घेत होते. आम्ही समजदार, घेवू काळजी पण तुम्ही द्या परवानगी,  ’माझं दुकान, माझा अधिकार, न्यायासाठी, हक्कासाठी’ अशा प्रकारचे फलक हातात घेवून आपापल्या दुकानासमोर निषेध व्यक्त केला. याप्रसंगी काही व्यवसायिकांनी आपले मत व्यक्त केले की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कसेतरी चरीतार्थ चालवला पण आज मात्र इतर  सर्व व्यवसाय चालू झाले तरी  सलून व्यवसाय मात्र बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने काढले. ते  अन्यायकारक आहे. योग्य ती खबरदारी घेवून तसेच सर्व प्रकारच्या दक्षता घेवून व्यवसाय चालू करायला सरकारने  परवानगी द्यावी. इतर राज्यांमधे सलून व्यवसायास परवानगी मिळालेली असताना महाराष्ट्र राज्यात दुजाभाव का केला जातो?खरेतर गर्दी होवू शकेल असे उद्योग व्यवसाय चालू असताना मग फक्त काय सलून बंदीमुळेच कोरना आटोक्यात राहिल काय? तसे पाहिले तर सलून व्यावसायिक आपला जीव धोक्यात घालून, स्वछतेचे काम करणारा आरोग्यदूतच  आहे. त्यामुळे खरेतर शासनाने आमच्या सह घरातल्या सदस्यांना विमा संरक्षण मिळायला पाहिजे. या आंदोलन प्रसंगी सर्व समाज बांधवांनी नगर येथे सुरु असलेल्या उपोषणाला जाहिर पाठिंबा व्यक्त केला. यावेळी नाभिक समाज संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन दिले.