Breaking News

अडीच महिन्यानंतर घरोघरी वर्तमानपत्र वितरण सुरु

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध शहरात घरोघरी वर्तमानपत्र वितरण करण्यास बंदी घालण्यात आली होती. ही बंदी उठविण्यात आल्यामुळे तब्बल अडीच महिन्यानंतर घरोघरी वर्तमानपत्र वितरण सुरु झाले आहे. वर्तमानपत्र वितरण सुरु झाले असले तरी देखील वितरकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 
मुंबई, पुण्यासह अनेक सोसायट्यांनी आम्हांला सोसायटीमध्ये वितरकांना प्रवेश करण्यास मनाई केल्यामुळे अनेकांपर्यंत पेपर पोहचू शकला नाही.  करोना
संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्याच्या अखेरीस देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आले. त्यामुळं वर्तमानपत्रांच्या वितरणावर परिणाम झाला. त्यातच वर्तमानपत्रांच्या माध्यमातूनही करोनाच्या विषाणूची लागण होत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे घरोघरी पेपरचे वितरण थांबवण्यात आले होते. कालांतराने वर्तमानपत्रातून विषाणूचा फैलाव होत नसल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला. त्यामुळे ही भीती दूर झाली. तरीही वर्तमानपत्रांचे वितरण करणार्‍या गरीब मुलांच्या आरोग्याशी तडजोड न करण्याची भूमिका घेत राज्य सरकारने घरोघरी पेपर देण्यावर निर्बंध कायम ठेवले. केवळ स्टॉलवरच वर्तमानपत्र मिळत होते. मात्र, मागील आठवड्यात राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला. काही नियम व अटी-शर्तींवर ही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता घरोघरी वाचकांना पेपर वाचायला मिळणार आहेत. असे असले तरी आज पहिल्या दिवशी खूपच कमी घरांमध्ये वर्तमानपत्र आले आहे. याबाबत वितरकांशी संपर्क साधला असता लाइन टाकणारी मुले आपापल्या गावाकडे निघून गेली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जी मुले इथे आहेत, ती भीतीपोटी अजूनही पेपर टाकण्यास तयार होत नसल्याचे वितरकांचे म्हणणे आहे.