Breaking News

आता राज्य सरकार खरेदी करणार बॉडी बॅग ; राजकारण तापल्यानंतर मुंबई महापालिकेने काढून घेतले अंग


मुंबई ः कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या व्यक्तीच्या मृतदेहासाठी खरेदी करण्यात येणार्‍या बॉडी बॅगमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. त्यामुळे यातून मुंबई महापालिकेने अंग काढून घेतल्यामुळे आता राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून या बॉडी बॅगा खरेदी करण्यात येणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कोविडमधील तज्ज्ञ डॉक्टर्सची कमिटी आता या बॉडी बॅगच्या खरेदीचा निर्णय घेऊन महापालिकेला पुरवठा करणार आहेत.
’कोविड करोना-19’ ने बाधित झालेल्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार सदर मृतदेह ’बॉडी बॅग’मध्ये ठेऊन अंत्यसंस्कारासाठी दिला जातो. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसाठी करण्यात आलेल्या या बॉडीबॅग्जची खरेदी 6 हजार 700 रुपयांना केली आहे. त्यामुळे अवघ्या 2000 ते 2200 रुपयांमध्ये मिळणारी बॅग महापालिकेने 6 हजार 700 रुपयांना घेतली. त्यामुळे सर्वप्रथम अंजली दमानिया आणि त्यानंतर महापालिकेतील भाजपच्या नेत्यांनी या बॉडी बॅग्जच्या खरेदीबाबत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वेदांत इन्फोटेक कंपनीकडून यापूर्वी 2 हजार 200 बॉडी बॅग्जची खरेदी प्रति नग 6 हजार 700 रुपयांना केली. निवड करण्यात आलेल्या उत्पादनाची केंद्र शासनाच्या संकतेस्थळावर या बॉडी बॅग्जची खरेदी प्रति नग 7 हजार 800 रुपये एवढी होती. परंतु महापालिकेला या उत्पादन कंपनीने प्रति बॅग रुपये 6 हजार 700 या दरात उपलब्ध करून दिली होती. मात्र, या बॉडी बॅग्जबाबत भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर, महापालिकेने यातून अंग काढून घेतले असून शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातूनच या बॅग्जची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाचे संचालकांच्या माध्यमातून बॉडी बॅग्जची खरेदी केली जाणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्स आदींच्या समितीमार्फत या बॅगची खरेदी करून यापुढे महापालिकेला पुरवठा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आरोप झाल्यानंतर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले होते.