Breaking News

येस बँक घोटाळाप्रकरणी ईडीचे छापे

मुंबई ः राज्यात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर तपास यंत्रणा देखील सक्रिय झाल्याअसून, सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) येस बँकेच्या घोटाळाप्रकरणी मुंबईत छापे टाकले. या छाप्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले.  येस बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मुंबईतील जागतिक पर्यटन व ट्रॅव्हल कंपनी ‘कॉक्स अँड किंग्स’ या संस्थेच्या पाच कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी छापे मारले.
अचानक छापे मारल्याने संशयितांमध्ये धडकी भरली. दोन महिन्यांहून अधिकच्या लॉकडाऊनमधून मुंबइची सुटका झाली. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर प्रशासन आणि इतर यंत्रणा कार्यरत झाली. याची प्रचिती ईडीच्या कामातून दिसून आली. येस बँकेतून मोठी कर्जे घेतलेल्या कंपन्या ‘ईडी’च्या रडारवर आहेत. आज पर्यटन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘कॉक्स अँड किंग्ज’ या कंपन्यांच्या मुंबईतील कार्यालयांवर ईडीने छापे टाकले. ‘कॉक्स अँड किंग्ज’च्या पाच कार्यालयांची आज ईडीच्या अधिकार्‍यांनी झडती घेतली. या आधी मार्च महिन्यात ईडीने ‘कॉक्स अँड किंग्ज’चे प्रवर्तक पीटर केरकर यांना समन्स बजावण्यात आला होता. ‘प्राइसवॉटर कूपर्स’ने फेब्रुवारीत केलेल्या फॉरेन्सिक ऑडीटमध्ये ‘कॉक्स अँड किंग्ज’ने घेतलेली कर्जे संशयास्पद असल्याचं आढळून आलं होतं. तसंच 21000 कोटींचा निधी संशयास्पदरित्या वळवला असल्याचं तपासात आढळलं. दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात कॉक्स अँड किंग्जचं शहरातील मुख्य कार्यालय आहे. यासह चार आणखी कार्यालयात आज ईडीच्या तपास पथकांनी छापे टाकले. ‘कॉक्स अँड किंग्ज’ने येस बँकेतून 2260 कोटींचं कर्जे घेतलं आहे. या व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय आला आहे.