Breaking News

शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत घाई नको ः राजन गोर्‍हे

पुणे ः कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुचविलेल्या उपाय योजनांचे पालन विद्यार्थ्यांकडून पूर्णपणे प्रत्यक्षात केले जाण्याची शक्यता वाटत नाही. तसेच विद्यार्थी वाहतूक हा देखील या काळातील एक अतिशय चिंतेचा विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन शासनाने सर्व बाबींचा साकल्याने विचार करून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत घाई नको, असे मत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजन गोर्‍हे यांनी व्यक्त केले. पुण्यातील विविध शिक्षण संस्थांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते.
कोविड 19 च्या काळात शिक्षण क्षेत्राला आता आपल्या अस्तित्वासाठीच संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजन गोर्‍हे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत संस्थांची याबाबतची भूमिका मांडली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात अशीही या चार संस्थांची स्पष्ट भूमिका असून  परीक्षा न घेता पूर्वप्राप्त गुणांची सरासरी काढून निकाल लागल्यास विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात खूप मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठात प्रवेश घेताना गुणवत्तेच्या निकषांचा विचार करता या विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अशाप्रकारे पदवी देण्यात आली तर भविष्यात संकटाला आमंत्रण दिल्यासारखे होईल. ‘कोरोना बॅच’ असा शिक्का या विद्यार्थ्यांवर बसेल. कोणतीच कंपनी व आस्थापने त्यांना नोकरी देण्यास धजावणार नाहीत. असेही या संस्थांचे म्हणणे आहे.