Breaking News

आजारपणात बहिणीने फोन केल्याचा आनंद वाटला

- धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

मुंबई/ प्रतिनिधी 
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच कोरोनावर मात केली आहे. दरम्यानच्या काळात बहीण पंकजा मुंडे यांचा फोन आल्याबद्दलची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. माझ्या आजारपणाच्या काळात बहीण पंकजा हिने फोन केला आणि सदिच्छा दिल्या, याचा आनंद वाटला, अशी भावनिक प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.
धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर दहा दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात असलेले मुंडे काही दिवसांपूर्वी घरी परतले असून, सध्या क्वारंटाइन आहेत. क्वारंटाइन असतानाच त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आणि आजारपणाचे अनुभव सांगितले. त्यात अर्थातच पंकजा यांनी फोन करून त्यांच्याशी केलेल्या चर्चेचाही उल्लेख होता. धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेकळताच पंकजा यांनी तातडीने त्यांना फोन केला होता. बंधू तब्येतीची काळजी घे आणि लवकर बरा होऊन घरी ये, अशा सदिच्छा पंकजा यांनी व्यक्त केल्या होत्या. त्याबद्दल विचारले असता धनंजय मुंडे म्हणाले, आमच्यात संघर्ष झाला होता. कुटुंबात दोन राजकीय विचारधारा आल्या. असे असतानाही बहिणीचा फोन आल्याचा मला आनंद झाला.
आपल्याला काही होणार नाही हा आत्मविश्‍वास मला नडला. कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समजताच कुटुंबाची चिंता लागली. घरात कुणाला कोरोनाची लागण झाली नसेल ना, हा विचार सतत यायचा. सर्वात आधी आईचा चेहरा समोर आला. मुलींनी सगळे समजून घेतले. आता माझी प्रकृती चांगली आहे. सध्या घरातच क्वारंटाइन आहे. जनतेच्या आशीर्वादाचे व आई-वडिलांच्या पुण्याईमुळे मला हे जीवन पुन्हा मिळाले आहे, अशी कृतज्ञता त्यांनी यावेळी व्यक्त केली. मानसिकदृष्ट्या खचून जाऊ नका. खूप आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असेआवाहन त्यांनी लोकांना केले आहे.