Breaking News

मोदींनी लढाई सोडली का?

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यास केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हे सपशेल अपयशी ठरले आहेत. मोदींनी कोरोनाविरोधातील लढाई सोडली असून, या देशाचे भवितव्य आता देवाच्याच हातात उरले आहे. कोरोना संक्रणाच्या संख्येत भारताने इटलीलाही मागे टाकले असून, आजरोजी देशात दोन लाख 56 हजार इतको कोरोनाबाधित आहेत. तर सात हजार 135 नागरिकांचे बळी गेलेत. जगात भारत सहाव्या क्रमांकावर असून, लवकरच तो ब्रिटनलादेखील मागेटाकेल, अशी दुर्देवी शक्यता आहे. ब्रिटन, स्पेन, रशिया आणि अमेरिका या सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या देशात आणि भारतात फारसे अंतर उरलेले नाही. कोरोनाविरोधातील लढाई आपण लढू आणि जिंकू असे पंतप्रधान मोठ्या गर्वाने म्हणाले होते. परंतु, ते ही लढाई जिंकू शकले नाहीत, किंबहुना त्यांनी या लढाईतून पळ काढला असेच आम्ही म्हणू. कोरोनाचा प्रादूर्भाव हाच मुळी मोदी सरकारची चूक आहे. शेजारच्या चीन देशात या विषाणूने धुमाकूळ घातला असताना आमची विमाने आंतरराष्ट्रीय उड्डाणे भरत होती. त्यातून लाखो प्रवासी देशात आलेत, आणि त्यांच्या मार्फत कोरोना विषाणूही अगदी बेधडक देशात घुसला. या प्रवाशांची वेळीच थर्मल स्कॅनिंग झाली असती, त्यांना वेळीच क्वॉरंटाईन केले गेले असते तर देशात आजचे दुर्देवी चित्र दिसले नसते. त्यानंतरही अगदी घिसाडघाईत लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांत अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजुरांवर तर कुर्‍हाड कोसळली. अनेकांचे रस्त्याने पायी जाताना मृत्यू झाले, काही रेल्वेच्या रुळाने चालत गेले, त्यांना मालवाहू रेल्वेने चिरडले. या मृत्यूचे पापही अर्थात नरेंद्र मोदी यांच्याच माथी मारावे लागेल. सुरुवातीच्या 21 दिवसांच्या लॉकडाऊन काळातच आपण कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकू असे मोदी म्हणाले होते.
त्यासाठी त्यांनी 18 दिवस चाललेल्या महाभारत युद्धाचा दाखलादेखील दिला होता. परंतु, झाले काय? आज पाच महिने झाले तरी कोरोना पीडितांचा आकडा हनुमानाच्या जळत्या शेपटीप्रमाणे झपाट्याने वाढत चालला आहे. कोरोनाविरोधात मोदी व त्यांचे अनुयायी अशाप्रकारे थयथयाट करत होते, की आता या देशातून कोरोना विषाणूचा समूळ नायनाट होईल. त्यासाठी बरीच नाटके आणि उठाठेवी झाल्यात. अगदी 22 मार्चला सायंकाळी टाळ्या आणि थाळ्या वाजवून झाल्या. त्या प्रसंगाचे तर देशभरात जुलूस निघालेत. त्यानंतर पाच एप्रिलला रात्री नऊ वाजता मेणबत्तीच्या प्रकाशात आरत्या झाल्यात. लोकं मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उंडरत होते. इतका तमाशा करून शेवटी झाले काय? कोरोना भारताच्या मानगुटीवर पक्का बसला; अन त्याने संपूर्ण देश आजरोजी उद्ध्वस्त केला. कोरोनाचा उद्रेक झालेला पहावयास मिळत असून, कोरोनाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पराभूत झाले आहेत. आयसीएमआरच्या अहवालानुसार, एप्रिलच्या सुरुवातीला कोरोना विषाणू पीडितांची संख्या 4.8 टक्के इतकी होती. लॉकडाऊनच्या काळात 16 एप्रिल ते 28 एप्रिलच्या काळात ती घटून 3.0 टक्क्यांवर आली. परंतु, जसजसा लॉकडाऊनचा सत्यानाश होत गेला तसतसा कोरोना पीडितांचा आकडा वाढत गेला. मागील काही दिवसांत तो दुप्पटीने म्हणजे 7.0 टक्के इतका झाला आहे.
देशात दररोज आठ हजार नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असून, हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे काहीही ठोस उपाययोजना नाहीत. तसेच, आता लॉकडाऊन हटविण्यास सुरुवात झाल्यान कोरोना प्रसाराचा वेग हा झपाट्याने वाढेल. बळींची संख्यादेखील तितक्याच गुणाकार गतीने वाढत जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलके पंतप्रधान आहेत. आपण, त्याला बोलघेवडे असेही म्हणू. बोलण्यात त्यांचे तोंड कुणी धरणार नाही. परंतु, त्यामुळे वस्तुस्थिती थोडेच बदलते? देशातील आजची कोरोनाबाधितांची संख्या अडिच लाखांच्यापुढे गेली असून, रविवारी तर रेकॉर्डतोड 11 हजार रुग्ण आढळून आले होते. तर महाराष्ट्रात सर्वाधिक 86 हजार रुग्ण आहेत. म्हणजेच महाराष्ट्राने चीनलादेखील मागे टाकले आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन शिथिल करण्याऐवजी तो अधिक कठीण करणे आणि घरात राहणार्‍या लोकांना आर्थिक आधार देणे गरजेचे असताना मोदी सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरु केली. आजच त्याचा पहिला टप्पा साजरा होत आहे. त्यानुसार, 24 मार्चपासून बंद करण्यात आलेले धार्मिक स्थळे, मॉल्स, रेस्टॉरंट खुली केली जात आहेत. त्यामुळे या सार्वजनिक स्थळांच्याद्वारे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव पुन्हा वाढण्याचा धोका आहेच. कोरोना हा जीवघेणा विषाणू असून, या विषाणूचा प्रसार केंद्र किंवा राज्य सरकार रोखेल, या भरवशावर आता नागरिकांनीच राहू नये. आपणच आपली काळजी घेतली तर या संकटातून सहीसलामत बाहेर पडू. कोरोनाचा देशात धुमाकूळ सुरु असताना मोदी सरकार जर अनलॉकची प्रक्रिया सुरु करत असेल, तर याचा सरळ अर्थ हे सरकार कोरोनापुढे पराभूत झाले आहे. देशाची ढासाळलेली अर्थव्यवस्था, कोरोनाचा प्रादूर्भाव आणि सरकारने टेकलेले हाथ पाहाता, या देशाचे काय होईल कुणास ठावूक?