Breaking News

गोपीचंद पडळकर बरळले; शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना!


- राष्ट्रवादीत संतापाची लाट, राजू शेट्टीही खवळले
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही उपटले कान
- भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका
- राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलनाची हाक, भाजपचा निषेध


पंढरपूर/पुणे/ विशेष प्रतिनिधी 
भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय  गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. पडळकरांच्या टीकेवर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उसळली आहे. विद्या चव्हाण, अमोल मिटकरी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पडळकरांवर जोरदार टीका केली. तर पक्षाने भाजपचा निषेध करत आंदोलनाची हाक दिली आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पडळकर यांचे कान उपटत, पडळकर यांचे विधान चुकीचे असल्याचे सांगितले. तेलवकरच खुलासा करतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. राजकीय विरोध असला तरी पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांबाबतची भाषा चुकीचे असल्याचे फडणवीस म्हणाले. तर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांनी राज्यात फिरून दाखवावे, असा इशारा दिला आहे.
पंढरपूर येथे कार्यकर्ता भेटीनिमित्त आले असता आ. गोपीचंद पडळकर म्हणाले, की देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, असा घणाघात पडळकर यांनी केला. शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील, असे पडळकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी आषाढीची पूजा करु नये - पडळकर
सध्या कोरोना संसर्ग असल्याने पंढरपुरात जर बाहेरील लोक, महाराज मंडळीना प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करु नये. सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटुंबास महापूजेचा मान द्यावा, असीही यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले.