Breaking News

पंढरपूरला जाऊ द्या; वारकर्‍यांची हायकोर्टात याचिका

- राज्य सरकारसमोरील डोकेदुखी आणखी वाढणार!
- जगन्नाथ पुरी रथ यात्रेला जर परवानगी मिळत असेल तर काही अटी शर्थींसह वारीलाही परवानगी द्यावी!

पुणे/विशेष प्रतिनिधी 
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून, त्यामुळे कोरोनाची परिस्थिती पाहता पंढरपूरच्या वारीला मनाई करण्यात आली आहे.  परंतु, आता वारकर्‍यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वाखरी ते पंढरपूर पायी वारी करू द्यावी, अशी मागणी वारकर्‍यांनी या याचिकेत केली आहे. जगन्नाथ पुरी रथ यात्रेला जर परवानगी मिळत असेल तर काही अटी शर्थींसह वारीलाही परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकेतून  पुण्यातील वारकरी सेवा संघाकडून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
वारकरी संघाच्या या याचिकेत प्रामुख्याने वाखरी ते पंढरपूरदरम्यानचे अंतर 100 वारकर्‍यांच्या उपस्थितीत चालत जाऊन पूर्ण करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नगर प्रदक्षिणा, स्नान, गोपाळकाला, वारीतील या परंपरा पूर्ण करण्यासाठी पोर्णिमेपर्यंत मुक्कामी राहण्याची परवानगीही देण्यात यावी, असेही याचिकेत म्हटले आहे. 29 मे रोजी कोरोना विषाणूच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मात्र नेण्यात येणार आहेत. दरम्यान, आपली आषाढी वारीची परंपरा आहे. आषाढी वारी आली आहे आणि मी पंढरपूरला चाललो आहे. विठूरायाला कोरोनाचे संकट संपवण्यासाठी आणि आरोग्यदायी आयुष्य मागण्यासाठी साकडे घालणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. मुख्यमंत्री या नात्याने नाही, तर तुमचा, वारकरी बांधवांचा प्रतिनिधी म्हणून पंढरपूरला जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

‘लोकमंथन’नेही हाच मुद्दा उपस्थित केला होता!

विशेष म्हणजे, रविवारच्या फोकस या स्तंभात दैनिक लोकमंथनचे कार्यकारी संपादक पुरुषोत्तम सांगळे यांनीही याच मुद्द्यावर भाष्य केले होते. जगन्नाथ पुरीच्या रथोत्सवाला जर सर्वोच्च न्यायालय आपला पूर्वीचा निर्णय फिरवून परवानगी देऊ शकतेतर पंढरपूरच्या वारीला अशी अटी व शर्तींसह परवानगी का मिळत नाही, हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता.