Breaking News

तुकाराम मुंढेंच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल

नागपूर : कोरोना प्रादुर्भावाच्या भितीमुळे सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि खासगी कार्यक्रम, सभा-संमेलनाला शासनाने बंदी घातली असताना सुमारे 200 लोकांच्या कार्यक्रमाला हजेरी लावून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध गणेशपेठ पोलिसांकडे एका नागरिकांने तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत सहायक पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरू केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनीष प्रदीप मेश्राम असे तक्रारकर्त्याचे नाव असून त्यांनी एका व्हिडीओचा संदर्भ या तक्रारीत दिला आहे. त्यानुसार, आयुक्त तुकाराम मुंढे हे येथील हॉटेल रजवाडा पॅलेसमधील सभागृहात 31 मे 2020 ला आयोजित कार्यक्रमात 200 लोकांच्या उपस्थितीत मंचावरुन संबोधन करताना दिसून येत असल्याचे म्हटले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या नियमांचे कुठल्याही प्रकारे पालन करण्यात आले नसल्याचे मेश्राम यांनी तक्रारीत नमूद केले आहे. कोरोना महामारीच्या काळात, भारत सरकारने अद्याप कोणत्याही स्वरुपाच्या राजकीय, सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी प्रदान केली नसताना, मुंढे यांनी या समारंभात उपस्थित राहून सरकारच्या दिशानिर्देशांचा भंग केल्याचे मेश्राम यांनी तक्रारीत म्हटले आहे.