Breaking News

रेशन चालकांच्या कुटुंबियांना पन्नास लाखांचा विमा


बेलापूर/प्रतिनिधी : कोरोनामुळे एखाद्या स्वस्त धान्य दुकानदारांचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला 50 लाख रुपयाचे विमा संरक्षण दिले जाईल तसेच मोफत तांदुळाचेही कमीशन लवकरच दिले जाईल असे अश्‍वासन वित्त मंत्री नामदार अजित पवार यांनी धान्य दुकानदारांच्या शिष्टमंडळांला दिले असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे
कोरोनाच्या संकट काळात धान्य दुकानदार आपला जीव धोक्यात घालून काम करत असल्यामुळे त्यांना विमा संरक्षण द्यावे, तामीळनाडू राज्या प्रमाणे दुकानदारांना वेतन देण्यात यावे मोफत धान्य वाटपाचे कमिशन तातडीने देण्यात यावे, पाँज मशिनला येणार्‍या अडचणी दूर करण्यात याव्यात या मागणीसाठी आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली 1 जुलै पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. या बाबत सर्व संबधीतांना निवेदन पाठविण्यात आले होते. धान्य दुकानदारांच्या संपाबाबत योग्य तो तोडगा काढण्यासाठी विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पुढाकार घेऊन वित्त मंत्री अजित  पवार याच्या समवेत बैठक घेतली. या वेळी शिष्टमंडळासमोर बोलताना वित्तमंत्री  अजित पवार म्हणाले की सध्याची कोरोनाची गंभीर परिस्थिती पहाता दुकानदारांनी संप करणे योग्य नाही. एखाद्या दुकानदारांचा कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला 50 लाख रुपयाचे विमा संरक्षण कवच  दिले जाईल. तसेच मोफत धान्य वाटपाचे कमीशनही दुकानदारांना अदा करण्यात येईल. शासन धान्य दुकानदारा बाबत सकारात्मक असुन दुकानदारांनीही आपले काम चोख बजवावे. दुकानदारांनी तातडीने संप मागे घेवुन कार्डधारकांना मालाचे वाटप सुरु करावे असेही ते म्हणाले.