Breaking News

परप्रांतीयांची स्तुती कसली करता?

मनसेने खासदार अरविंद सावंतांना सुनावले 
मुंबई ः  दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या एका व्हिडीओमध्ये ते परप्रांतीय मजुरांचे कौतुक करताना दिसत आहेत. अरविंद सावंत यांच्या या भूमिकेवर मनसेने टीकास्त्र सोडले असून, काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. मनसेचे सरचिटणीस आणि नेते नितीन सरदेसाई यांनी अरविंद सावंत यांना कोंडीत पकडले आहे. परप्रांतीय मजुरांची स्तुती करून तुम्ही राज्यातील तरुणांच्या काम करण्याच्या क्षमतेवर सवाल उपस्थित केला आहे. तुम्ही परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्रात येण्यास सांगत आहात, पण तुम्हीसुद्धा महाराष्ट्राचे मुंबईचे खासदार आहात हे विसरू नका, असा दमच मनसेने भरला आहे. तुम्ही महाराष्ट्रातील तरुणांची हेटाळणी करताय आणि परप्रांतीयांचे गोडवे गाताय. आपल्या मुलाला ‘कार्टा’ आणि दुसर्‍याच्या मुलाला ‘बाब्या’ बोलणं बंद करा, असे सरदेसाई म्हणाले आहेत. अरविंदजी तुम्ही महाराष्ट्रातल्या मुंबईचे खासदार आहात. दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्हाला तिकडे पाठवले आहे. यापुढे परप्रांतीयांचे गोडवे गाणे बंद करा आणि महाराष्ट्रातील मुले व्यवसायात कशी पुढे जातील यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला नितीन सरदेसाई यांनी दिला आहे.  आपण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या रोजगाराच्या संधीचा विचार केला पाहिजे. तो न करता परप्रांतीय किती चांगलं काम करतात याची स्तुती कशी काय करता?, असा सवालही नितीन सरदेसाईंनी विचारला आहे.