Breaking News

सरकारकडे वर्षभर पुरेल इतके अन्नधान्य!

- केंद्र सरकारकडे 58.49 दशलक्ष टन गहू, तांदूळ उपलब्ध
- अनलॉक झाले तरी घाबरण्याचे काहीही कारण नाही

खास प्रतिनिधी/मुंबई
कोरोना विषाणूचा प्रकोप रोखण्यासाठी कें
द्र व राज्य सरकारने लॉक डाऊन केल्यानंतर आता देश अनलॉककडे वाटचाल करत असताना,  बहुतांश नागरिकांनी घरात रेशन व डाळदाणा यांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, नागरिकांनी अन्नधान्याचा साठा करण्याची काहीही गरज नसून, केंद्र सरकारकडे तब्बल 58.49 दशलक्ष टन गहू व तांदूळ यांचा साठा असून, डाळी, तेल व साखर यांचादेखील पुरेशा प्रमाणात साठा असल्याची माहिती फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय)च्या वरिष्ठस्तरीय अधिकारी सूत्राने दिली आहे. जवळपास वर्षभर पुरेल इतके धान्य असल्याचे हा अधिकारी म्हणाला.
कोरोना विषाणूचा प्रकोप रोखण्यासाठी महाराष्ट्र, पंजाब, उत्तरप्रदेश, नवी दिल्लीसह देशातील सर्वच राज्यांनी लॉक डाऊन केले होते.  महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसारख्या मोठ्या शहरात नागरिकांनी अन्नधान्य खरेदीसाठी दुकानांत मोठी गर्दी केली होती. तर अद्यापही नागरिक गर्दी करत आहेत. तसेच, काही दुकानदार साठेबाजीही करत आहेत. या पृष्ठभूमीवर एफसीआयच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले, की केंद्र सरकारकडे अन्नधान्याचा बफर स्टॉक आहे. गहू व तांदूळ यांचा 58.49 दशलक्ष टन साठा असून, तीन दशलक्ष टन डाळी, 1.1 दशलक्ष टन खाद्य तेल आणि चार दशलक्ष टन साखरेचा बफर स्टॉक सरकारी गोदामांत पडून आहे. गरज पडल्यास या बफर स्टॉकद्वारे देशातील सर्व राज्य सरकारला त्यांच्या रेशन दुकानांसाठी वर्षभर अन्नधान्याचा पुरवठा करता येईल. सद्या केंद्र व राज्य सरकारच्या ताब्यातील सर्व गोदामे अन्नधान्यांनी भरलेली असून, कोणत्याही गोदामात अन्नधान्य साठवण्यासाठी जागा शिल्लक नाही, असेही हा अधिकारी म्हणाला. 2020 च्या हंगामातही 106 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे धान्य साठवण्याचे मोठे संकट निर्माण होणार आहे.