Breaking News

चीनकडून पुन्हा विश्‍वासघात? -पँगोंग त्सो तलाव परिसरात चिनी सैन्य तैनातबीजिंग /वृत्तसंस्था
भारत आणि चीन संघर्षानंतर चर्चेने विषय सोडवू आणि सीमेवरील सैन्य मागे घेऊ, असे आश्‍वासन देणार्‍या चीनने आपला शब्द पाळलेला नाही. पँगोंग त्सो तलावाजवळ चीनने आपली कुमक वाढवली आहे. याबाबतचे ओपन सोर्स इंटेलिजेंस अ‍ॅनालिस्टने नवीन सॅटेलाइट इमेज जारी केले आहेत.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पँगोंग त्सो तलाव परिसरात ठाण मांडले असल्याचे या सॅटलाईट इमेजनुसार कळते. तसेच, हळूहळू चीनची सैन्य लहान गटांद्वारे वाढत आहे. पँगोंग त्सो तलावापासून दक्षिणेकडील भागात 19 किलोमीटर अंतरावर चीन सैन्याची जमवाजमव दिसून आली आहे. एकदाच मोठ्या संख्येने येण्याऐवजी चिनी सैन्य लहान गट करून जमा होत आहेत. ही सैन्य वाढ जाणीवपूर्वक करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
--
भारत-चीन लष्करी बैठकीत काय झाले?
भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला सीमावाद मिटवण्यासाठी दोन्ही सैन्यात सोमवारी चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही देशांमध्ये सैन्य माघारी घेण्याबाबत एकमत झाले. त्यामुळे पूर्व लडाखमध्ये वादग्रस्त जागांवरून सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा झाली. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशातील सैन्य याची अंमलबजावणी करतील, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली. चीन आणि भारत यांच्यातील वाढता सीमावाद या पार्श्‍वभूमीवर काल मोल्डो या नियंत्रण रेषेपलीकडील भागात ही बैठक पार पडली. लेफ्टनंट जनरल स्तरावर ही बैठक झाली असून तब्बल 12 तास यात चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीत झालेल्या काही मुद्द्यांनुसार सीमेवरून सैन्य मागे घेण्यास  दोन्ही देशांचे एकमत झाले.