Breaking News

नगरमध्ये कोरोनाचा कहर!

- शहरात सहा रुग्णांची नव्याने भर
- जिल्ह्यात 15 नवे करोनाग्रस्त आढळले

अहमदनगर/ प्रतिनिधी
शहरात काल आढळलेल्या 24 कोरोनाग्रस्त रुग्णांसह जिल्ह्यात 28 रुग्ण आढळल्याच्या पाठोपाठ शनिवारी सकाळच्या अहवालात जिल्ह्यात पुन्हा 15 जणांना करोनाचा संसर्ग झाला असल्याचे निदान झाले आहे. यात नगर शहरातील 6 जणांचा समावेश आहे. नालेगाव येथे तीन, आडतेबाजार, तारकपूर आणि नगर शहरातीलमध्यवर्ती भागातील प्रत्येकी एक जणाचा यात समावेश आहे. याशिवाय श्रीगोंदा येथे तीन, राहता येथे दोन, कोपरगाव, पारनेर, श्रीरामपूर आणि संगमनेर येथे प्रत्येकी एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
यामुळे जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव रुग्णांची संख्या ही 111 झाली असून, शनिवारच्या रुग्णांमध्येनालेगावातील 70 वर्षीय वृद्ध, 24 वर्षीय युवक, 21 वर्षीय युवती, आडते बाजारातील 37 वर्षीय महिलेला करोनाचा संसर्ग झाला आहे. नगर शहराच्या मध्यवर्ती भागात 61 वर्षीय महिला आणि तारकपूर येथे 40 वर्षीय तरुणाला करोनाची बाधा झाली आहे. श्रीगोंदे येथील 38 आणि 30 वर्षीय दोन पुरुष आणि एका 58 वर्षीय महिलेला करोनाचा संसर्ग झाला आहे. राहाता येथील 21 वर्षीय युवती आणि 51 वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाली आहे. संगमनेर येथे 38 वर्षीय तरुण, पारनेर येथे 28 वर्षीय युवती, श्रीरामपूर येथे 30 वर्षीय युवक आणि कोपरगाव येथे 45 वर्षीय पुरुषाला करोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात शनिवारी 8 करोनाग्रस्त आजारातून बरे होऊन घरी परतले. यामध्ये, संगमनेर, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी दोन, नगर तालुका आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 397, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 273 झाली आहे.

व्यापार पेठ तीन दिवस बंद

नगर शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे रविवार ते मंगळवार तीन दिवस शहरातील व्यापार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय अहमदनगर आडतेबाजार मर्चन्टस् असोसिएशनच्यावतीने घेण्यात आला असल्याची माहिती असोसिएशनचे सचिव संतोष बोरा व राजेंद्र चोपडा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली. नगर शहर ही जिल्ह्याची बाजारपेठ आहे. शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रशासनावर अधिक ताण येत आहे. आजपर्यंत प्रशासनाने व्यापार्‍यांना भरपूर सहकार्यकेले आहे. ही बाब लक्षात घेऊन करोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी मार्केटयार्ड, आडतेबजार, दाळमंडई, तापकीरगल्ली, दाणेडबरा व जवळील परिसरातील व्यापार पेठ रविवार दि. 28 जून ते मंगळवार दि. 30 जून असे तीन दिवस बंद राहणार आहे. व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवून प्रशासनास सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

कोहीनूरचे दोन कर्मचारी कोरोनाबाधित

कापड बाजारातील कोहिनूर वस्त्रदालनातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी कोहिनूर दुकान शनिवारी दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या दुकानात काम करणार्‍या सर्वच कर्मचार्‍यांची तपासणी केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर दुकान सुरू अथवा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.