Breaking News

रामदेव बाबा यांचे कोरोनावरील औषध वादाच्या भोवर्‍यात


परवानगीशिवाय औषधाची चाचणी घेतल्याने होणार कारवाई 
जयपूर : कोरोना प्रतिबंधक औषध समोर आणून जगभरात खळबळ उडवून देणारे पंतजली योेगपीठाचे प्रमुख योगगुरु बाबा  रामदेव यांनी विनापरवानगी औषधाची चाचणी घेतल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे संकेत राजस्थान सरकारने दिले आहेत.
रामदेव बाबांनी ज्या रुग्णांवर या औषधांच्या चाचण्या केल्या असा दावा केला, मात्र त्या रुग्णांना कोरोना झालाच नव्हता असा दावा राजस्थान आरोग्य प्रशासनाने केल्यामुळे रामदेव बाबा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. रामदेव बाबा यांनी कोरोना प्रतिबंधक औषधासाठी कुठल्याही प्रमाणित वैद्यकीय संस्थेची मान्यता तसेच शासकीय परवानगी न घेता हे औषध तयार करून प्रसिद्धीस आणल्यामुळे ते वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. आयुष मंत्रालयाने या औषधाच्या जाहीरातीवर बंदी आणलेली असतानाच आता राजस्थान सरकारने कुठल्याही परवानगीशिवाय औषधाची चाचणी घेतल्याने रामदेव बाबांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून न्यायालयात खटला दाखल करण्याचे संकेत दिले आहेत. रामदेव बाबांनी कोरोनावर औषध शोधल्याचा केलेला दावा हा फ्रॉड असल्याचा आरोप राजस्थान सरकारने केला आहे. याबाबत राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा म्हणाले की, कोरोनाच्या संकटाच्या काळात बाबा रामदेव यांनी ज्याप्रकारे औषध विकण्याचा दावा केला आहे, ती योग्य बाब नाही. आयुष मंत्रालयाच्या गॅझेट नोटिफिकेशननुसार बाबा रामदेव यांनी आयसीएमआर आणि राजस्थान सरकारकडून कोरोनाच्या कुठल्याही आयु्र्वेदिक औषधाच्या ट्रायलसाठी परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र कुठल्याही परवानगीविना कुठल्याही निकषांविना औषधाची चाचणी घेतली गेली आहे. ही बाब चुकीची आहे, असे रघू शर्मा यांनी सांगितले. या प्रकरणी आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. तसेच आमच्या एका डॉक्टरांनी एक खटला दाखल केला आहे. त्यानुसारसुद्धा कारवाई होई, असे रघू शर्मा यांनी सांगितले.चौकट. . .
ते कोरोना रुग्ण नव्हतेच
कोरोनावरील औषधाची क्लिनिकल ट्रायल जयपूरमधील नॅशनल इंस्टिट्युट ऑफ मडिकल सायन्स अँड रिसर्च (निम्स) येथे करण्यात आल्याचे पतंजली रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टने आयुष मंत्रालयाला सांगितले होते. तसेच आपण सर्व नियमांचे पालन केल्याचा दावा केला होता. हा दावा खोडून काढताना मुख्य वैद्यकिय अधिकार्‍यांनी सांगितले की, तिथे कुठल्याही औषधाची चाचणी घेण्यासाठी आमच्याकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. तिथे आम्ही जे रुग्ण भरती केले होते त्यांच्यामध्ये कुठलीही लक्षणे दिसून येत नव्हती. कुणालाही ताप, खोकला किंवा गळ्यात खवखव नव्हती. असे सर्व रुग्ण 7 ते 10 दिवसांत बरे झाले. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.


चौकट. . .
ताप, खोकल्याच्या औषधासाठी दिला होता परवाना
 आम्ही पतंजलीला रोगप्रतिकारक क्षमता, ताप आणि खोकल्यासाठी औषध बनवण्यासाठी परवाना दिला होता. त्यांनी आमच्याकडे कोरोनासंबंधी कोणताही उल्लेख केला नव्हता, असा खुलासा उत्तराखंड आयुर्वेद विभागाच्या अधिकार्‍यांनी केला आहे. या औषधांबद्दल आपल्यापर्यंत कोणतीही माहिती पोहोचली नसल्याचे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे. अशाप्रकारची औषधे शोधल्याचा दावा करण्याची जाहिरात करणे हे ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहीरात) 1954 या कायद्याचा भंग असल्याचे म्हटले आहे.