Breaking News

‘निसर्ग’च्या तडाख्यानंतर आज केंद्रीय पथक राज्यात

मुंबई ः राज्यातील कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिल्यामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून 100 कोटींची तातडीची मदत दिली असून, पाहणी अहवालानंतर अतिरिक्त मदत देण्यात येणार आहे. तब्बल आठवडाभरानंतर केंद्रीय पथक आज पाहणी दौर्‍यावर येत आहे. केंद्रीय पथक 15 ते 18 जून या कालावधीत कोकण दौर्‍यावर येणार आहे. रमेश कुमार गांता(आयएएस) हे या दौर्‍याचे प्रमुख असणार असून ग्रामीण विकास मंत्रालय, वित्त मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय आणि कृषी मंत्रालयाचे प्रतिनिधी देखील यावेळी या पथकात असतील. 
राज्यातील मंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर आता केंद्रीय पथक देखील पाहणी दौर्‍यावर येणार असून या दौर्‍यातून नुकसानग्रस्त भागाला काय मदत मिळणार किंवा काही स्पेशल पॅकेज जाहीर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केंद्रीय पथक झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्याचा अहवाल केंद्र सरकाला सादर करणार आहे. त्यानंतरच केंद्राकडून राज्याच्या झोळीत किती हजार कोटी रुपयांची मदत पडणार हे स्पष्ट होईल. केंद्रीय पथकाचे 15 जून रोजी मुंबईत आगमन होईल. त्यानंतर 16 जून रोजी सकाळी सव्वानऊ वाजता भाऊचा धक्का येथून रो-रो सेवेने रायगड मांडवा जेट्टीकडे प्रयाण करणार आहे. मांडवा जेट्टी येथे सकाळी 10 वाजता पथक दाखल होणार आहे. अलिबाग-चौल, मुरूड, श्रीवर्धनचा दौरा ते करणार आहेत. बुधवारी दिनांक 17 जून रोजी हे पथक रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड आणि मुरूड येथे पाहणी दौऱा करणार आहे. रत्नागिरीसोबतच रायगड येथे देखील हे पथक पाहणी करणार आहे. त्यानंतर 17 जूनला महाडहून रत्नागिरीकडे प्रयाण करून दिवसभर तेथील नुकसानीची पाहणी करणार आहेत. 18 जून रोजी दापोलीहून सकाळी लवकर निघून ते मांडवा जेट्टी येथून रो-रो सेवेने मुंबईला रवाना होणार आहे.