Breaking News

केंद्राचा विचार, कमी अभ्यासक्रम व वेळ ठेवणार!

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
देशभरात करोना विषाणूचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकार आगामी शैक्षणिक वर्षात शालेय अभ्यासक्रमात आणि शाळांमधील तासिकांमध्ये कपात करण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. देशातील शाळा व महाविद्यालये सुरु करण्याबाबत राज्य सरकारशी चर्चा सुरु आहे. राज्यांच्या सल्ल्यानुसार याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
देशातील सध्याची परिस्थिती पाहता आणि शिक्षक व पालकांकडून आलेल्या मोठ्या प्रमाणवरील मागणीचा विचार करता, आम्ही येत्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात व तासिकांमध्ये कपात करण्याच्या पर्यायावर विचार करत आहोत, असे पोखरियाल यांनी सांगितले. करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या व परीक्षांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वीच पोखरियाल यांनी 15 ऑगस्ट नंतर शाळा सुरू होतील, असे संकेत दिलेले आहेत. असे जरी असले तरी सर्व काही त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून राहणार आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाउनचा पाचवा टप्पा एक जूनपासून सुरु झाला आहे. या पाचव्या टप्प्यामध्ये अनेक सेवा पुन्हा सुरु करण्यासंदर्भात काही अटी आणि शर्थी ठेवत परवानगी देण्यात आली आहे. या अगोदर शालेय शिक्षण सचिव अनिता करवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्यांच्या शिक्षण सचिवांनी विद्यार्थांच्या आरोग्य व सुरक्षा, शाळांमधील स्वच्छता संबंधी उपाय आणि ऑनलाइन व डिजिटल शिक्षणाशी निगडीत मुद्द्यांवर सोमवारी चर्चा केली होती. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर असून, ज्या देशांनी शाळा सुरु केल्यात तेथे मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे याबाबत निर्णय घेताना केंद्र सरकार सावधपणे पाऊले उचलत आहेत.

जूनमध्ये शाळा सुरु करण्याचा अट्टहास नको
कोरोनाचे संक्रमण दिवसंदिवस वाढत असून, इस्त्रायलसारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू नये, यासाठी शाळा जून महिन्यात सुरु करण्याचा शासनाने अट्टाहास करु नये. तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने कोरोनाचे संक्रमण अटोक्यात आल्यास शाळा सुरु करण्याचा विचार करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.