Breaking News

श्रीगोंद्यात राष्ट्रीय पक्षी मोराची हत्या?

- वनक्षेत्रपालाकडून माहिती लपविण्याचा प्रयत्न

कोळगाव : योगेश चंदन
श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे या ठिकाणी राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची याची काही इसमानी हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या प्रकरणी वनविभाच्या अधिकाऱ्यांनी काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
मात्र, या पक्षी हत्याकांड प्रकरणी वन विभागाचे वन क्षेत्रपाल यांनी माहिती देण्याचे टाळले असून मोराच्या हत्यचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.       
श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे या ठिकाणी मोर या राष्ट्रीय पक्षाची हत्या झाल्याची माहिती वनविभागाचचे अधिकारी आणि कर्मचारी यांना गुप्त माहितीदारांकडून मिळताच, तालुक्यातील वनरक्षक, वनक्षेत्रपाल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता अधिकाऱ्यांना घटनास्थळी मोराचा एक पाय, पिसे तसेच हरणाची कातडी आणि शिकारी साठी लागणारे सर्व साहित्य मिळाले असून या प्रकरणी ३ ते ४ जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले असून वनविभागा मार्फत आज सकाळी हि कारवाई झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
याविषयी माहिती घेण्यासाठी वनक्षेत्रपाल नातू यांना अनेकदा संपर्क केला असता, त्यांनी सायंकाळी ३ वाजे पर्यंत या बाबत सविस्तर माहिती देतो. कारवाई चालू आहे. अशी उत्तरे दिली. मात्र त्यानंतर त्यांनी मोबाईल स्वीकारणे बंद केले. याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी, जिल्हा वनरक्षक अरुण रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता , त्यांनी याबाबत माहिती घेऊन सांगतो असे सांगितले. त्यांनाही हि माहिती दिली नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे वनक्षेत्रपाल नातू यांनी ही माहिती कोणाच्या सांगण्यावरून आणि कश्यासाठी लपवली याची सखोल चौकशी करण्याची खरी गरज निर्मण झाली आहे.