Breaking News

बरीचशी कामे ‘जैसे थे’

कोळगाव/प्रतिनिधी :  शहराचे महत्वाचे उपनगर असणार्‍या शिक्षक कॉलनी व शाहू नगर चा रस्ता व्हावा म्हणून नागरपालिकेसमोर शाहूनगर येथील नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण होईल, हे आश्‍वासन पालिकेने  दिले होते. त्या आश्‍वासनाची आज वर्षपूर्ती झाल्याचे स्मरण पत्राद्वारे नागरिकांनी नगरपरिषदेस आठवण करून दिली आहे. या अनोख्या आश्‍वासनाच्या वर्षपूर्ती ची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
या संदर्भात येथील नागरिकांनी नगराध्यक्षा शुभांगी मनोहर पोटे, वार्डातील नगरसेवक गणेश भोस व सुनीता संतोष खेतमाळीस यांना निवेदन दिले आहे. आपले मत मांडताना येथील नागरिक म्हणाले,  15 ते 20 वर्षे पासून येथील नागरिकाना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दाट लोकवस्ती व शहराची ज्या भागात झपाट्याने वाढ होत आहे तेथेच नगरपालिकेला  प्राथमिक गरजा पूर्ण करता येत नाहीत, हे मोठे दुर्दैव आहे. येथे ड्रेनेज लाइन नाही, रस्ता नाही. अनेक वर्षांपासून आमची मागणी आहे. पण दखल घ्यायला कोणी तयार नाही. पावसाळ्यात तर येथून चालताही येत नाही.  येथील नागरिक नगरपालिकेला  पाणी पट्टी , घरपट्टी देत नाही काय ? अजून किती दिवस आपण नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार आहात ? किती मरणयातना देणार आहात ? अशा संतप्त प्रश्‍नाची सरबत्ती केली.
 अनेक वर्षे प्रलंबित असणार्‍या या प्रश्‍नावर लवकर मार्ग काढावा. नगरपालिकेने या विषयीचा ठराव मागच्या वर्षी केला आहे. जर अडचण येत असेल तर शिक्षक कॉलनी व शाहूनगर दोन सेपरेट एस्टीमेट करून टप्पा टप्प्याने काम करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी दीपक  शिंदे, राजेंद्र कळसकर , संभाजी मगर, सुरेश साळवे , गणेश औंरंगे, रासकर डी. डी. आदी  उपस्थित होते.