Breaking News

‘त्या’ सावकारावर सहाय्यक उपनिबंधकांनी केला गुन्हा दाखल

पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील जवळा येथील प्रकाश हरिभाऊ कोठावळे ऊर्फ पिंटु सावकार याच्यावर बेकायदेशीर सावकारी केल्याबाबत पारनेरच्या सहकार विभागाच्या सहाय्यक उपनिबंधकांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर सावकारी अधिनियम 2014च्या कलम 39 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद सहकार विभागातील अधिकारी तात्याभाऊ भोसले यांनी काल पारनेर पोलिस ठाण्यात दिली.याबाबतचा पुढील तपासाचे काम पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांच्याकडे सोपवले आहे.
याबाबतची माहीती अशी, तालुक्यातील जवळे येथील एका महिलेला या सावकाराने गेल्या ऑक्टोबर महिन्यात 12 हजार रुपये व्याजाने दिले होते. पुढे या महीलेने वेळोवेळी या सावकारा  व्याज दिले, परंतु मुद्दल रक्कम फिटत नव्हती.सावकार व त्यांची पत्नी  वारंवार या महिलेला घरी येवून व्याजासह संपुर्ण रकमेची मागणी करत होते. महिलेकडे शेवटचे साडेसात हजार रूपये थकले होते  म्हणून  सावकाराच्या  पत्नीने दि. 1 मे रोजी पिडीत महिलेला मारहाण केली. त्यानंतर सावकाराच्या त्रासाची तक्रार महीलेने पोलिस व सहकार विभागाकडे केली परंतु  त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या  महीलेने लोकजागृती सामाजिक संस्थेकडे तक्रार करत याबाबतचे व पुरावे दिले. त्यानंतर संस्थेने  हि माहीती सोशल माध्यमांवर प्रसारित केली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रनेवर मोठी टिका झाल्यावर मात्र त्यांनी तातडीने दखल घेत सावकाराच्या घरावर छापा मारला होता.
त्यानंतर पिडीत महीला व सावकार यांची चौकशी करून तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे सहकार विभागाने त्या सावकारावर गुन्हा दाखल केला आहे.हा सावकार केवळ महिलांनाच व्याजाने पैसे देत होता अशीही माहिती समोर आली  आहे. व्याजाची वसुली करण्यासाठी  सावकार नेहमी आपल्या पत्नीचा वापर करत होता. पैसे वेळेला न दिल्यास तो महिलांना धमकावत होता, अशीही माहिती स्थानिकांकडून मिळाली. हा  सावकार विविध महिला बचत गट, ग्रामीण कुट्टा , उन्नत्ती फायनान्स, पतसंस्थांचे महिलांना कमी व्याजाने दिले जाणारे कर्ज आपल्या  पत्नीच्या नावे उचलून  अव्वाच्या सव्वा व्याजाने गरजू महिलांना देत होता हे पुरावे ही सहकार विभागाने तपासले.