Breaking News

दहावी ते बारावीचे वर्ग जुलै महिन्यापासून !

मुंबई ः राज्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा सुरु होणार का, की डिजिटल शिक्षणांचा पर्याय निवडण्यात येणार, याविषयी विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र  शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मान्यता दिल्यामुळे राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यात येणार आहे. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागासोबत बैठक पार पडली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड बैठकीत उपस्थित होत्या. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.रेड झोनमध्ये नसलेल्या 9, 10-12 वी शाळा-कॉलेज जुलैपासून, 6 वी ते 8 वी ऑगस्ट पासून, वर्ग 3 ते 5 सप्टेंबरपासून, वर्ग 1 ते 2 री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने सुरु करण्यात येणार आहे. इयत्ता 11 वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणार्‍या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या  मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  राज्यात प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल पद्धतीने शाळा सुरु करण्यात येणार आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने राज्यात जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची तयारी दर्शवली होती. शाळा सुरू करण्यासंबंधीच्या मार्गदर्शक तत्वांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली आहे.
 यानुसार राज्यात जुलै महिन्यापासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु होणार आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी एक महिना गावात कोणताही करोनाचा रुग्ण आढळलेला नाही याची खात्री करावी लागणार आहे. त्यानंतरच शाळा सुरु करण्याची परवानगी आहे. विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आड वर्ग भरवण्याचीही मुभा असून शाळा सुरू करण्यापूर्वी त्यांनी सॅनिटायझेशन करणे बंधनकारक असणार आहे. तसंच प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्याची अट आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांना मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. शाळा सुरु करताना परिस्थितीचा आढावा घेऊनच करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाला आज सुरुवात होत असताना करोना पार्श्‍वभूमीवर शैक्षणिक कामकाज कसे सुरू होणार याकडे शिक्षण जगताचे लक्ष वेधलं होतं. विद्यार्थी-पालक यांनाही याविषयी कुतूहल निर्माण झाले होतं. मात्र करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत शाळा बंद ठेवण्यात याव्यात, असे आदेश सोमवारी शाळांना शिक्षण विभागाकडून प्राप्त झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने नवीन निर्णय जाहीर केले आहेत.