Breaking News

वाळू चोरी व वाहतूकप्रकरणी तीन हायवा चालकांवर गुन्हे

पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील शिंदेवाडी फाटा येथे चोरीच्या वाळूची विनापरवाना बेकायदा वाहतूक करताना आढळून आल्याने पोलिसांनी सापळा लावून तीन हायवा पकडल्या.  यात 45 लाख 42 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन हायवा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की खडकवाडी येथून शिंदेवाडी फाटा मार्गे आळेफाटा येथे तीन डंपर हे वाळू चोरुन वाहतूक करणार आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, पोलीस नाईक सुधीर खाडे, पोलीस कॉन्स्टेबल सत्यजित शिंदे, सुरज कदम, रमेश शिंदे, गणेश धुमाळ यांच्या पथकाने शिंदेवाडी फाटा या ठिकाणी जाऊन तेथे सापळा लावला. दुपारी बाराच्या सुमारास पोखरी कडून तीन नंबर आले, डंपर चालकांना थांबून त्यांना चौकशी केली असता चौकशीअंती तिघांना ताब्यात घेतले.
साहेबराव दिनकर कुदनर (वय 24, रा. शिंदोडी ता. संगमनेर), रेवजी लिंबा वारे ( वय 36 रा. खडकवाडी ता. पारनेर)  तुषार शिवाजी घोडे ( वय 36 राहणार बेल्हे ता जुन्नर) या तीनही चालकांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन डंपर मध्ये प्रत्येकी 3.5 ब्रास वाळू आढळून आली. तीनही चालकांकडे वाळू वाहतूक परवाना नव्हता. तसेच त्यांच्याकडे रॉयल्टी आढळून आली नाही. त्यामुळे यांनी चोरून वाळू आणले असल्याची खात्री झाल्याने त्यांचे डंपर व वाळू जप्त केली आहे. यांच्याविरोधात पारनेर पोलीस स्टेशन मध्ये कलम 379/188 सह गौण खनिज कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत.