Breaking News

ताज हॉटेल बॉम्बने उडवू!

- कराचीतून आला फोन 
- मुंबईत हायअ‍ॅलर्ट

मुंबई/प्रतिनिधी 
मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटलेलला पाकिस्तानातून धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. अज्ञातांनी रात्री उशिरा हॉटेलमध्ये फोन करुन मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू, अशी धमकी दिली. हा फोन पाकिस्तानच्या कराचीमधून आला होता. त्यानंतर हॉटेल परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली. सोमवारी कराचीमधल्या शेअर बाजारात हल्ला झाला. आता ताज हॉटेलवर हल्ला करण्यात येईल, अशी धमकी फोनवरून देण्यात आली. त्यामुळे पोलिसयंत्रणा सतर्क झाली असून, हायअ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. 
धमकीचा फोन आल्यानंतर हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी तातडीने मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ताज हॉटेलच्या सुरक्षेत वाढ केली. ताज हॉटेलमध्ये धमकीचा फोन करणार्‍या व्यक्तीने आपले स्वत:चे नाव ‘सुलतान’ असल्याचे म्हटले आहे. याशिवाय आपण पाकिस्तानातून बोलतोअसेही तो म्हणाला. त्याने ताज हॉटेलमध्ये पुन्हा 26/11 सारखा हल्ला करु, अशी धमकी दिली. कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये झालेला दहशतवादी हल्ला सगळ्यांनी बघितला. आता ताज हॉटेलमध्येही 26/11 सारखा हल्ला पुन्हा एकदा होणार, असेदेखील तो फोनवर म्हणाल्याची माहिती आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास हा कॉल आला होता. तो ताज हॉटेलमधील कर्मचार्‍याने उचलला होता.