Breaking News

सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल डिझेल महागले

नवी दिल्ली ः कोरोनाच्या संकटाने सर्वसामान्य त्रस्त असतांनाच, सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती महागल्या. दिल्लीत पेट्रोल 54 पैशांनी महागले आहे. त्यामुळे दिल्लीकरांना पेट्रोलसाठी 73 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 58 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 71.17 रुपयांवर गेला आहे.  मुंबईतही पेट्रोल-डिझेल महागले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 52 पैशांनी तर डिझेलचे दर 55 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे मंगळवारी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 80.01 रुपये आणि 69.92 रुपये मोजावे लागतील. गेल्या 80 दिवसां
त पहिल्यांदा रविवारी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 60-60 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सलग तिसर्‍या दिवशी पुन्हा महाग झाले आहे.  सरकारी तेल कंपन्या असलेल्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान ऑईल कॉर्पोरेशन यांनी गेले 82 दिवस इंधनाच्या दरांचा दररोज घेतला जाणारा आढावा बंद ठेवला होता. मात्र रविवारपासून अचानक या कंपन्यांची हा आढावा पुन्हा सुरू करून दरवाढ जाहीर केली आहे. सरकारने 14 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करामध्ये वाढ केली, मात्र तेल कंपन्यांनी ही वाढ ग्राहकांवर न टाकता स्वत: सोसत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिजतेलाच्या किमती दोन दशकामधील नीचांकी आल्या तरी या कंपन्यांनी त्याचा लाभ ग्राहकांना न देता किमती कायम ठेवल्या होत्या. या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमी झालेल्या दरांचा लाभ ग्राहकांना न मिळता कंपन्यांनी आपला नफा वाढविण्याला प्राधान्य दिलेले दिसले. भारत आपल्या गरजेपैकी 85 टक्के खनिजतेलाची आयात करीत असतो. 16 जून 2017 पासून दररोजच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांप्रमाणे देशातील इंधनाचे दर ठरविले जात होते.