Breaking News

कोरोनाने हाहाकार!

नवी दिल्ली/वृत्तसंस्था
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. भारतातही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला असून,  सलग नऊ दिवस दहा हजारांच्या आसपास वाढणारी संख्या काल 11 हजारांच्या जवळ पोहोचली होती. त्यानंतर देशात गेल्या 24 तासात पहिल्यांदाच नव्या रुग्णांनी 11 हजाराचा आकडा पार केला असून, नवा उच्चांक गाठला आहे. नव्या रुग्णवाढीचा हा आकडा धडकी भरवणारा आहे.
देशात गेल्या 24 तासात दिवसभरात 11 हजार 458 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 8 हजार 993 इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे देशात 8 हजारहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला असून मृतांची एकूण संख्या 8,884 इतकी झाली आहे. दरम्यान, देशातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 1 लाख 45 हजार 779 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 54 हजार 330 रुग्ण उपचाराने बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात समूह संसर्ग झाला नसल्याचा दावा केला असून,  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 49.47 टक्के असल्याचेही सांगितले. देशात सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राने एक लाख करोनाबाधित रुग्णांची संख्या ओलांडली आहे. महाराष्ट्रानंतर गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, पश्‍चिम बंगालमध्येही करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.