Breaking News

शरद पवार महाराष्ट्राला झालेला कोरोना! - आ. गोपीचंद पाडळकरांची जहरी टीका


- पाडळकरांनी तोंड आवरावे; जितेंद्र आव्हाडांनी ठणकावले

पंढरपूर/ विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत, असे जळजळीत वक्तव्य करत भाजपचे नवनियुक्त आमदार गोपीचंद पाडळकर पुन्हा एकदा बरळले आहेत. पत्रकार परिषदे दरम्यान त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पाडळकर यांनी तोंड आवरावे, असा इशारा दिला. 
कार्यकर्ता भेटीच्या निमित्ताने दौर्‍यावर असतेवेळी पाडळकर यांनी हे वक्तव्य केले. राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्यावर बोचरी टीका करत त्यांची तुलना पडळीकरांनी कोरोना व्हायरसशी केली. पवार हे राज्याचा झालेला कोरोना असल्याचे ते म्हणाले. अवकाळीच्या वेळी शरद पवार यांनी नाशिकला भेट दिली, त्या ठिकाणच्या शेतकर्‍यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. यानंतर आता काही दिवसांपूर्वीच कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या ’निसर्ग’ चक्रीवादळामुळे नुकसान झाल्यानंतरही पवारांनी वादळग्रस्त भागाला भेट दिली. तेथील नागरिकांची भेटही घेतली. पण, अद्याप या ठिकाणीसुद्धा मदत मात्र मिळालेली नाही, असे म्हणत कोरोना काळातही सराकरमध्ये एकमत नसल्याचे पाडळकर म्हणाले.
पत्रकार परिषदेमध्ये पडळकर यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असणार्‍या उद्धव ठाकरे यांना उद्देशूनही वक्तव्य केले. सध्या कोरोना संसर्ग असल्याने पंढरपुरात जर बाहेरील लोक, महाराज मंडळीना प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करू नये. सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटुंबास महापूजेचा मान द्यावा, असे पाडळकर म्हणाले.