Breaking News

राजस्थान सरकार पाडण्यासाठी भाजपने मुंबईतून 500 कोटी पाठवले

- मुंबई काँग्रेसचा गंभीर आरोप
- राज्याच्या गृहमंत्र्यांना माहिती दिली - सचिन सावंत

मुंबई/ विशेष प्रतिनिधी
राजस्थानातील अशोक गेहलोत सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मुंबईतून 500 कोटी रुपये पाठवण्यात आले असा गंभीर आणि घणाघाती आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. केंद्र सरकार ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही ती राज्ये अस्थिर करण्याचा पद्धतशीर अजेंडा राबवत आहे, अशीही टीका सावंत यांनी केली.
गेहलोत सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून 500 कोटी जमवले आणि ते राजस्थानला पाठवले, असा गंभीर आरोप सावंत यांनी केला. या प्रकरणात आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालावे आणि या प्रकरणाची चौकशी करावी, अशीही मागणी सचिन सावंत यांनी केली. फक्त राजस्थानच नाही तर कर्नाटकच्या आमदारांना भाजप सरकारच्या काळात मुंबईमधल्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याच्या घरी यासंदर्भात बैठका होत होत्या. राजस्थान सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी मुंबईतल्या बिल्डर आणि व्यावसायिकांकडून 500 कोटी जमा केले आणि ते राजस्थानला पाठवले, असेही सावंत यांनी सांगितले. या प्रकरणाची कल्पना मी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिली आहे. असेही सावंत यांनी स्पष्ट केले.