Breaking News

5 ऑगस्टला राममंदिराचे भूमिपूजन

- पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार
- तीन वर्षात मंदिर पूर्ण करणार - विश्‍वस्त मंडळ

अयोध्या/ विशेष प्रतिनिधी
देशाच्या राजकारणात गेली तीन दशके वादळ निर्माण करणार्‍या राम मंदिर निर्मितीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसते आहे.  उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचे काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीखदेखील निश्‍चित झाली असून, 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरांचे भूमिपूजन करतील. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर या भूमिपूजन सोहळ्याला ठराविक लोकच उपस्थित राहतील.
अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्याच्या मुद्यावर रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्‍वस्त मंडळाची शनिवारी दुपारी बैठक झाली. भूमिपूजनासाठी 3 व 5 आगस्ट असे दोन मुहूर्त काढण्यात आले होते. त्यातील 5 तारखेला पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिली आहे. आता मुहूर्तावर काम सुरू झाल्यानंतर तीन वर्षांच्याआत अयोध्येत भव्य मंदिर उभारण्यावर आणि मंदिराची उंची वाढविण्यावर या बैठकीत एकमत झाले. अयोध्येतील विश्रामगृहात दुपारी तीन वाजता सुरू झालेली बैठक सुमारे अडीच तास चालली. मंदिराच्या नकाशात बदल करण्यात येणार असून, आता मंदिरात तीनऐवजी पाच घुमट असणार आहेत. नकाशात मंदिराची जी उंची निश्‍चित करण्यात आली आहे, ती वाढविण्याचा निर्णयही घेण्यात आला, अशी माहिती विश्‍वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय यांनी बैठकीनंतर दिली. कोरोनाचे संकट आटोक्यात आल्यानंतर मंदिरासाठी निधी गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात येईल. भूमिपूजन झाल्यानंतर तीन ते साडेतीन वर्षांत मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले असेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


असे असेल नवे राम मंदिर
गर्भगृहापासून शिखराची उंची ही 138 फुटाऐवजी 161 फूट इतकी असणार आहे. आधीच्या मॉडेलमध्ये दोनच घुमटांची रचना होती, त्याऐवजी आता पाच घुमट करण्यात येणार आहेत. जमिनीत 60 मीटर खोलवर खोदकाम करुन पाया भक्कम करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये ट्रस्ट निर्माण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या राम मंदिर ट्रस्टमध्ये सहापेक्षा अधिक सदस्य असू शकतात. मंदिरासाठी उत्तर प्रदेश सरकारचे 500 कोटींचे बजेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राम मंदिराच्या 8 किलोमीटरच्या परिघात धर्मशाळा, हॉटेल बांधण्यास परवानगी नसेल.