Breaking News

बा विठ्ठला ! महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर!

- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाचरणी साकडे

पंढरपूर/ विशेष प्रतिनिधी 
महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री  विठ्ठलाच्या चरणी बुधवारी घातले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्याहस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली. कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला  माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी  सांगितले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे देण्यात आला.

अस्वस्थ वाटू लागल्याने आदित्य ठाकरेंनीविठ्ठलाची महापूजा अर्धवट सोडलीआषाढी एकादशीनिमित्त पहाटे 2.20 वाजता पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची महापूजा सुरू असतानाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना विठ्ठलाची महापूजा अर्धवट सोडावी लागली. त्यांना महापूजेतून बाहेर पडावे लागले. काही वेळाने बरे वाटल्यानंतर ते पुन्हा पूजेच्या ठिकाणी आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक विठ्ठलाची तब्बल 40 मिनिटे महापूजा केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मंदिराच्या गाभार्‍यात महापूजेसाठी बसले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांना गुदमरल्यासारखे झाले आणि अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना पिण्यासाठी पाणी देण्यात आले. त्यानंतर अर्धा तास गाडीत बसल्यावर त्यांना थोडे बरे वाटू लागले. त्यानंतर ते पुन्हा मंदिराच्या गाभार्‍यात गेले. मात्र तोपर्यंत विठ्ठलाची व रुक्मिणीचीही महापूजा आवरलेली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे कुटुंबीय विश्रांतीगृहावर गेले. तेथे त्यांनी काही काळ विश्रांती घेतली. आता आदित्य ठाकरे यांची प्रकृती चांगली आहे.