Breaking News

शहरात सातच्याआत घरात!

- सायंकाळी सात ते पहाटे पाच वाजेपर्यंत बाहेर फिरण्यास प्रतिबंध
- जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश जारी
- महानगरपालिका हद्दीत कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

अहमदनगर/प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा  एक भाग म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास 3 जुलैपासून ते दि. 17 जुलै 2020 पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेश जारी केला आहे.
याशिवाय सायंकाळी सात ते पहाटे पाच या कालावधीत तातडीच्या वैद्यकीय कारणा व्यतिरिक्त व्यक्तींच्या हालचालींस परवानगी असणार नाही. अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढून रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सायंकाळी सात ते पहाटे पाच या वेळेत कन्टेन्मेंट झोन वगळता काही बाबतीत सदर लागू नसेल. यामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम, आस्थापना यांचेकडील कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी. रुग्णालय, दवाखाने, औषधे, फार्मा, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी संबंधित आस्थापना. इलेक्ट्रीसिटी, पेट्रालियम, ऑईल आणि ऊर्जा संबंधीत व्यक्ती , आस्थापना. दूरसंचार, इंटरनेट सेवा पुरविणार्‍या आस्थापना. प्रसारमाध्यमे प्रतिनिधी (मीडिया), जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडील वैध ओळखपत्र असलेले प्रतिनिधी, अन्न धान्य, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे होम डिलीवरी सेवा, पिण्याचे पाणी पुरवठा व दुरुस्तीविषयक कामकाज संबंधित, मालवाहतूक करणारे ट्रक्स, टेम्पो, यांना मात्र हे आदेश लागू नसतील. उपरोक्त कालावधीत सकाळी 5 ते सायंकाळी 7 या कालावधीत यापूर्वीच्या आदेशानुसार परवानगी असलेले व्यवहार, कृती, क्रिया (एक्टीव्हीटीज) सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी कन्टेमेंट झोन वगळता जवळच्या परिसरामध्ये हालचालीस परवानगी राहील. शहराच्या दूरच्या भागामध्ये हालचालीस परवानगी असणार नाही. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना, यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पुन्हा 24 रुग्ण आढळलेजिल्ह्यातील 37 कोरोनाग्रस्त रुग्ण शुक्रवारी बरे होऊन घरी परतले असतानाच  दुपारी 24 नवे रूग्ण सापडले आहेत. यात पारनेर तालुक्यातील भोंद्रे येथील एकाचा समावेश आहे. नगर शहरातील 14, भिंगार 02, संगमनेर तालुका 02 (कुरण आणि एस. बी. चौक, संगमनेर), भातकुडगाव (शेवगाव) 01, दाढ बु. (राहाता) 01, खेरडे (पाथर्डी) 01, भोंद्रे (पारनेर) 01, केसापुर (राहुरी) 01, कोळगाव (श्रीगोंदा) 01 रूग्णांचा समावेश आहे.