Breaking News

मराठा क्रांती मोर्चा उद्या रस्त्यावर उतरणार!


मराठा क्रांती मोर्चा उद्या रस्त्यावर उतरणार!
---------
- मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांचा इशारा
- दहा दिवसांपूर्वी सांगूनही ठाकरे सरकारने काहीच न केल्याचा आरोप
- कायगाव टोका येथे कडेकोट बंदोबस्त, गुप्त पोलिसही तैनात
औरंगाबाद/ प्रतिनिधी :
मराठा क्रांती मोर्चातर्पेâ आता 'आत्मबलिदान' आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून, कायगाव टोका येथे गुरुवारी (दि.२३) आंदोलन करण्यावर मराठा कार्यकर्ते ठाम असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिली. या आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न केले. परंतु, आंदोलक ठाम राहिल्याने पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद व नगर पोलिसांनी औरंगाबाद - नगर हा महामार्ग गुरुवारी बंद ठेवला आहे. गनिमी काव्याने आंदोलन होण्याची शक्यता पाहाता, कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात आपले जीव गमावलेल्या मराठा समाजातील तरुणांच्या कुटुंबाला राज्य सरकारने वार्‍यावर सोडले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने कोणतीही मदत दिली नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारला दहा दिवस आधीच आंदोलनाचा इशारा दिला होता. तरीदेखील सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे आंदोलनावर ठाम असल्याचे रमेश केरे पाटील यांनी सांगितले. काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाने मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे जलसमाधी घेतली होती. त्याच ठिकाणी गुरुवारी आंदोलन करणार करण्यात येणार आहे. दुसरीकडे, कायगाव टोका येथे होणार्‍या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलिसांनी आतापासून फौजफाटा तैनात केला असून, पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलले तरी आंदोलनावर मराठा क्रांती ठोक मोर्चा ठाम असल्याचे रमेश केरे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे हे आंदोलन गनिमी काव्याने होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्‍या ४२ कुटुंबातील व्यक्ती देखील या आंदोलनात सामील होणार आहेत. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्यावतीने देण्यात आला आहे.
--
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली ग्वाही
दरम्यान, मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल, ही भीती ओबीसी समाजाला वाटते. ती त्यांनी मनातून काढून टाकावी, मी महाधिवत्तäयांशी चर्चा केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही. याबाबत ओबीसी समाजाच्या शंका-कुशंका आणि भीती दूर करण्यासाठी महाधिवक्ता यांच्यासमवेत तुमची भेट घडवून आणू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मंगळवारी केले होते. तसेच, आपले सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले आहे.