Breaking News

अष्टवाडा येथील महिला अज्ञात व्यक्तीच्या त्रासाने भयभीत, पोलिसांना दिले निवेदन

पाथर्डी प्रतिनिधी : 
शहरातील अष्टवाडा परीसरात गेल्या पंधरा दिवसांपासून एक अज्ञात व्यक्ती पहाटेच्या वेळी महिलांच्या गळ्यातील व कानातील दागीने ओरबाडून चोरुन नेण्याचा प्रयत्न करत असल्याने या परिसरातील महिलामधे भितीचे वातावरण पसरले आहे.तसेच सदर व्यक्ती असभ्यपणे महिलांचा गळा दाबण्याचा देखील प्रयत्न करतो.आरडाओरडा केल्यास अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी होत आहे.याचा त्वरित बंदोबस्त करावा या मागणीचे निवेदन कुलस्वामिनी महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा आरती निऱ्हाळी यांच्यासह महिला शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांना दिले                                   
पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पाथर्डी पोलिस स्टेशन हद्दीतील अष्टवाडा परीसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पहाटे पाच ते सहा या वेळेत एक अज्ञात व्यक्ती महिला चे गळ्यातील व कानातील दागीने ओरबाडून नेण्याचा प्रयत्न करत आहे.असा प्रकार शहरातील अनेक महिलांबरोबर झाला आहे.पहाटेच्या वेळी पाणी सुटते त्यामुळे महिलांना दाराबाहेर पाणी भरण्यासाठी यावे लागते त्यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. तरी त्या अज्ञात व्यक्तीचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे आरती निऱ्हाळी,रंजना मनेळ,सुनिता चोथे,अनिता भातोडे,शैला बडदे,वंदना बागडे,लक्ष्मी जोशी,मंगल खाटीक यांनी केली आहे.                                       दरम्यान,या अज्ञात इसमाने पाथर्डी शहरातील काही उपनगरात देखील धुमाकूळ घातला असून याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.तसेच पहाटेच्या सुमारास पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे.