Breaking News

कलेक्टरसाहेब नगर लॉकडाऊन करा!

- वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खासदास विखेंचा प्रशासनाला सल्ला


अहमदनगर/प्रतिनिधी
कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाने सावध भूमिका घेत, कमीत-कमी पाच दिवस जनता करर्फ्यू लावावा. हे एक खासदार म्हणून नव्हे, तर डॉक्टर म्हणून मत व्यक्त करीत आहे. वेळीच लॉकडाउन केले नाही, तर कोरोनाची परिस्थिती अधिक धोकादायक होईल. त्यास सर्वस्वी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हेच जबाबदार असतील, असे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
तर आमदार संग्राम जगताप म्हणाले, की लॉकडाउनबाबत प्रशासनाकडून प्रस्ताव आला पाहिजे. प्रशासन प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आहे. परिस्थितीनुसार लॉकडाउनसंदर्भात प्रशासन योग्य वेळी विचार करील. पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, जिल्हा रुग्णालयातील टेस्टिंग लॅबमध्ये एक हजार अहवाल पेंडिंग राहतात. महापालिका क्षेत्रात व ग्रामीण भागात रोज 200 रुग्ण आढळत आहेत. दहा दिवसांपूर्वी स्वॅब घेऊनही नागरिकांना अहवाल मिळत नाहीत. त्यामुळे नागरिक अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. विळद घाटातील लॅबमध्ये आजअखेर 429 जणांची तपासणी केली, त्यांत तब्बल 137 पॉझिटिव्ह आढळले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त तपासणीची गरज आहे. तसेच, 24 तासांत अहवाल यायला हवा. जिल्हा रुग्णालयातून अहवालास उशीर होत असल्याने, कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा रुग्णालयाला खासदार निधीतून 12 रुग्णवाहिका देणार असल्याचेदेखील खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले.