Breaking News

देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु!

- देशातील स्थिती बिघडली : आयएमए 

नवी दिल्ली/ प्रतिनिधी
देशात कोरोना विषाणूचे दहा लाखांहून अधिक रुग्ण समोर आल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु झाला असल्याचे म्हटले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के.  मोंगा यांनी याबाबत महत्वाचे वक्तव्य केले. डॉ. मोंगा म्हणाले की, प्रत्येक दिवशी देशात 30 हजारहून जास्त रुग्ण समोर येत आहेत. ही फार गंभीर स्थिती आहे. आता हा संसर्ग देशातील ग्रामीण भागातदेखील सुरु झाला, याचा अर्थ असा आहे की, देशात  कम्युनिटी ट्रांसमिशन सुरु झाले आहे, असे डॉ. मोंगा यांनी सांगितले.
येणार्‍या काळात कोरोना संसर्गाची स्थिती अधिक गंभीर होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात असून, समूह संसर्गाच्या स्थितीत संसर्ग झालेल्या व्यक्तीला कुणाकडून आणि कोठे संसर्ग झाला याचा तपास करणे अशक्य होते आणि त्यामुळे संसर्गाचा वेगही वाढतो. डॉ. मोंगा म्हणाले, की कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही पसरत आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. दिल्लीमध्ये आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा आणि मध्य प्रदेशमधील दुर्गम भागात काय होणार? असे ते म्हणाले. कोरोना हा असा आजार आहे, जो खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारांनी संपूर्ण सावधगिरी बाळगली पाहिजे, तसेच केंद्र सरकारची मदत घेतली पाहिजे. या व्हायरल आजाराला रोखण्यासाठी 70 टक्के लोकसंख्येची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यावर लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.