Breaking News

निवृत्ती महाराज देशमुख हे हिंदू धर्माचे उत्तम प्रबोधनकार - शंकर गायकर

निवृत्ती महाराज देशमुख हे हिंदू धर्माचे उत्तम प्रबोधनकार - शंकर गायकर
अकोले/ प्रतिनिधी
निवृत्ती महाराज देशमुख हे हिंदू धर्मातील  उत्तम प्रबोधनकार आहेत. अनेकांचे उद्धवस्त झालेले संसार त्यांच्या प्रबोधनामुळे सुरळीत झाले आहेत. गेली २५ वर्षे कीर्तनातून ते लोकांचे प्रबोधन करीत आहेत. त्यांच्या प्रबोधनाचा अनेक लोकांना फायदा झालेला आहे. त्यांच्या प्रबोधनामध्ये हिंदू ग्रंथ पुराणाचा संदर्भ असतो. त्याच अनुषंगाने त्यांनी सम विषम तारखेबद्दल आपले प्रबोधन केलेले आहे. त्यांचा त्यामागे समाजात कोणताही अपप्रचार करण्याचा हेतू नव्हता. त्यांचे सामाजिक कार्य सर्व राज्यात सर्वश्रुत आहे. हिंदू धर्माचार्यांची वाढती लोकप्रियता ही हिंदू धर्म विरोधकांना खपत नाही त्यामुळे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून समाजात हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या साधुसंतांना त्रास देण्याचे षड्यंत्र काही मंडळीनी चालवले आहे अश्या प्रवृत्तीचा बिमोड केल्या शिवाय बजरंग दल स्वस्थ बसणार नाही. पुरोगाम्या मध्ये दम  असेल तर त्यांनी इतर धर्मातील अनिष्ठ रूढी व परंपरा या विरुद्ध कार्यवाही करण्याची हिम्मत दाखवावी, किवा हिंदू धर्माला बदनाम करण्याचे उद्योग त्वरित थांबवावे अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारल्या शिवाय बजरंग दल स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रिय मंत्री शंकर गायकर यांनी दिला.
      गुरुवार दि २३ रोजी शंकर गायकर यांनी ओझर येथे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या निवास्थानी भेट दिली व सुमारे तासभर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.या वेळी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी ह.भ.प. अजित महाराज दिघे,प्रदीप भाटे,यांच्या सह ह.भ.प.सोमनाथ महाराज भोर,ह.भ.प. किरण शेटे,कुलदीप नेवासकर,संकेत आरोटे आदी उपस्थित होते.
            कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर भाष्य करुन अनेकांची मनं जिंकणारे कीर्तनकार म्हणून इंदुरीकर महाराजांना ओळखलं जातं. अनोख्या व  रोखठोक शैलीमुळे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला मोठी गर्दी होत असते.
        सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनात केलं होतं. त्यावरून राज्यभर गदारोळ उठला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांनी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. इंदोरीकर महाराजांनी या प्रकरणी खुलासाही केला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्यावर कायदेशीर कारवाईच्या मागणीवर पुरोगामी संघटना ठाम होत्या. अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्यांना कोर्टाच्या वाऱ्याही कराव्या लागणार आहेत.
       या आधीही अनेक राजकीय नेत्यांनी व विविध सामाजिक संघटना व संप्रदायांनी इंदोरीकर महाराजांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, महाराज कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर संपूर्ण देशभर पसरलेल्या व आक्रमक हिंदुत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे नेते शंकर गायकर यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेतल्यामुळं वेगळीच चर्चा रंगली असून व या पुढील लढाई हिंदुत्व वादी संघटना विरुद्ध पुरोगामी अशी रंगण्याची चिन्हे आहेत.
---------