Breaking News

काहींना वाटते, मंदिर बांधून कोरोना जाईल!

- शरद पवार यांचा पंतप्रधान मोदी सरकारला टोला


सोलापूर/विशेष प्रतिनिधी
अयोध्येमध्ये राममंदिराचे काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडणार आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले. कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचे हे ठरवले पाहिजे. आम्हाला वाटते की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटते की मंदिर बांधून कोरोना जाईल, असा टोला पवारांनी केंद्र सरकारला हाणला.
शरद पवार हे सोलापूर दौर्‍यावर असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, कोरोनामुळे नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. कोरोना संकटाता सापडलेल्या लोकांना कसे बाहेर काढायचे याबाबत आम्ही विचार करत आहोत, त्याला आम्ही प्राधान्य देत आहेत. काही लोकांना वाटत असेल मंदिर बांधून कोरोना जाईल. त्यामुळे राममंदिर बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा, त्याबाबत मला माहिती नाही. राज्य आणि केंद्र सरकारने कोरोना संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लॉकडाऊनमुळे लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिस्थितील लोकांना मदत करण्यास प्राधन्य दिले पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्‍न मांडतील, असे शरद पवारांनी याप्रसंगी सांगितले. सोलापूर दौर्‍यात पवारांनी भाजपवासी झालेल्या मोहिते-पाटील समर्थकांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना ऊत आला होता.