Breaking News

कर्जत तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्रावर कारवाई, खत विक्री बंदचे दिले आदेश !

कर्जत तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्रावर कारवाई, खत विक्री बंदचे दिले आदेश !
कर्जत/प्रतिनिधी :
कर्जत तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्रावर कर्जतच्या कृषी विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत चालकाला युरिया खत विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दुकानात आढळून आलेल्या विविध त्रुटींवरही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय कृषी अधिकारी राजाराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी दिपक सुपेकर तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी रूपचंद जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दुरगाव येथील गुरुदत्त कृषी सेवा केंद्र तसेच कर्जत शहरातील लकी कृषी सेवा केंद्र येथे ही कारवाई करण्यात आली. विक्रीस ठेवलेल्या खतांची खरेदी बिले उपलब्ध करून न दिल्याने दुरगावच्या कृषी सेवा केंद्र चालकाला युरिया तर कर्जतच्या केंद्र चालकाला डीएपी खत विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. पथकामध्ये तालुका कृषी अधिकारी दिपक सुपेकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी रूपचंद जगताप यांच्यासह कृषी पर्यवेक्षक विकास मोढळे, नवनाथ जत्ती, शंकर मेरगळ, कृषी सहाय्यक दत्ता घोडके यांचा समावेश होता.

कृषी सेवा केंद्रात आढळलेल्या त्रुटी :

विहित नमुन्यात बिले न देणे, विक्रीस ठेवलेल्या सर्व उत्पादकांच्या स्रोतांचा समावेश नसणे, विक्रीस ठेवलेल्या खतांची खरेदी बिले नसणे, बिलावर विक्रेत्यांची व शेतकऱ्याची सही नसणे, खत विक्री बाबतचा मासिक अहवाल वरिष्ठांना न कळविणे, दुकानात वजन काटा उपलब्ध नसणे अशा अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यानुसार अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे.