Breaking News

परीक्षा नाहीच, शाळा आताच नाही!

परीक्षा नाहीच, शाळा आताच नाही!

- रोखठोक मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
- मी लॉकडाऊन उघडतो, लोकं मृत्यूमुखी पडली तर जबाबदारी घ्याल का?
मुंबई /प्रतिनिधी
अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत याबाबत राज्यपालांनीही मला कळवले आहे. शाळाही आता सुरु होणार नाहीत. अन्यत्र शाळा सुरु होऊन मुलांना बाधा होऊ शकते. मुंबईच्या रस्त्यावर वडापाव लवकरच मिळेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या मुलाखतीत सांगितले. शिवसेना नेते व या दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी  ठाकरेंनी राज्यातील कोरोना स्थिती आणि विरोधकांवर आपले मत प्रखडपणे मांडले.
उद्धव ठाकरे म्हणाले, अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत याबाबत राज्यपालांनीही मला कळवले आहे. शाळाही आता सुरु होणार नाहीत. अन्यत्र शाळा सुरु होऊन मुलांना बाधा होऊ शकते. शाळा कधी सुरु होणार यापेक्षा शिक्षण कसे सुरु होणार असे विचारा. मी निर्णय घेताना टीकेची पर्वा करत नाही, बरोबर वाटेल ते करतोच, परीक्षा व्हावी असे मलाही वाटते, पण परिस्थिती तशी नाही. तिसर्‍या वर्षांच्या मुलांना सरासरी मार्क देऊन अडथळे दूर केले आहेत. सरासरी मार्क नको असलेल्यांना परीक्षेचाही पर्याय उपलब्ध आहे. राज्यात काही शहरांमध्ये टप्प्याटप्यात लॉकडाऊन केला जात आहे. यावरुन काहीजण सरकारवर टीका करत आहेत. याविषयी संजय राऊत यांनी मुलाखतीत प्रश्न केला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, एका बाजूला लॉकडाऊन केला पाहिजे का?, तर त्याला विरोध करणारे अनेक शहाणे आहेत. लॉकडाऊनने काय साधले?, लॉकडाऊन म्हणजे उपचार आहे का?, लॉकडाऊनने आर्थिक संकट येत आहे, लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला. ठीक आहे बाबा, आम्ही तुम्हाला उघडून देतो. मात्र त्यानंतर दुर्देवाने लोकं मृत्युमुखी पडले तर तुम्ही घेणार का त्याची जबाबदारी?, असा सवालही याप्रसंगी ठाकरे यांनी केला. मुंबईच्या रस्त्यांवर वडापाव लवकरच मिळेल. कोरोनाने धारावीचे उदाहरण सार्‍या जगाला दिले आहे. वॉशिंग्टन पोस्टनेही मुंबईत लपवाछपवी नाही, असे म्हटले आहे. विरोधक काय म्हणतायत त्याकडे लक्ष देत नाही. देवच म्हणतोय मी तुमच्यातच आहे, मंदिरात येऊ नका. लॉकडाऊन आहेच, एकेक गोष्टी सोडवत आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.