Breaking News

महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य!

महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य!

- राजकारण!
- अशोक चव्हाण नाराज; केला मुख्यमंत्र्यांना फोन
- महाविकास आघाडीतील कुरबुरी संपेना
- चव्हाणांना न विचारताच खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव
मुंबई/प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचा दावा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र दर काही दिवसांनी अंतर्गत कुरबुरी चव्हाट्यावर येणे, ही आता नित्याची बाब झाली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याला निर्णय प्रक्रियेत विचारात घेतले जात नसल्याचे सांगत, नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यातील भेटीनंतर ही नाराजी दूर झाल्याचेही सांगितले जात होते. परंतु, आता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून ही नाराजी बोलून दाखवल्याचे समजते. त्यामुळे आता हे नाराजीनाट्य किती लांबणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशोक चव्हाण यांच्या खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव त्यांच्याशी चर्चा न करताच तयार करण्यात आला. मंत्र्यांना न विचारता अधिकारी परस्पर प्रस्ताव तयार करत असल्याने अशोक चव्हाण नाराज झाले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून ही नाराजी बोलून दाखवल्याचे समजते. यापूर्वीही अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र, यानंतरही परिस्थिती न सुधारल्यामुळे अशोक चव्हाण यांची नाराजी वाढल्याचे समजते. गेल्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊन, पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या, वीज कंपन्यांवरील अशासकीय सदस्यांच्या नियुत्तäत्या आदी मुद्द्यांवरून महाविकास आघाडीतील पक्ष आमने सामने आले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्यावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सातत्याने पुढाकार घेऊन आतापर्यंत या वादांवर पडदा टाकण्याचे काम केले आहे. परंतु, सातत्याने नाराजीचे सूर उमटत राहिल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा कारभार कसा चालवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
--
अधिकारी बनले शिरजोर!
गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावरुन चांगलेच घमासान झाले असल्याची माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे निर्णय चव्हाण यांना डावलून होत असल्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. सद्याच्या खात्याचे विभाजन होऊन नवीन खाती निर्माण होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी यांचे विभाजन करुन नवी खाती निर्माण करण्याचा प्रस्तावही अशोक चव्हाणांना न सांगता आणला होता. आता या विभागांना मंजुरी देण्याची वेळ आली तेव्हादेखील ती फाईल अशोक चव्हाणांसमोर ठेवली नव्हती. त्यामुळे अशोक चव्हाण तीव्र संतापले आणि त्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.
--------------------------