Breaking News

भारताचा चीनला पुन्हा दणका;आणखी ४७ अ‍ॅप्सवर बंदी!- पब्जीवरही टांगती तलवार !

भारताचा चीनला पुन्हा दणका;आणखी ४७ अ‍ॅप्सवर बंदी!
- पब्जीवरही टांगती तलवार
नवी दिल्ली/प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपूर्वी भारताने ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. आता पुन्हा एकदा भारत सरकार चीनवर डिजिटल स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने आणखी ४७ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. हे ४७ अ‍ॅप्स आधीच्या ५९ अ‍ॅप्सचे क्लोन आहेत. कोणत्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली, त्यांची नावे समोर आलेली नाहीत. तसेच याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. या बंदी घातलेल्या अ‍ॅपमध्ये पब्जी आणि अली एक्स्प्रेसचाही समावेश असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने एक नवीन यादी तयार करण्यात येत आहे. या यादीत कोणते चिनी अ‍ॅप बंद करण्यात येतील याचा अभ्यास केला जात आहे. सध्या तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये अनेक गेमिंग अ‍ॅपचा समावेश आहे. त्यामुळे लवकरच भारतात प्रसिद्ध झालेले काही चिनी गेम्सवरही बंदी घातली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी २०० पेक्षा अधिक अ‍ॅप्सची यादी तयार केली जात आहे. हे चिनी अ‍ॅप भारतातील डेटा चीनसोबत शेअर करत आहेत आणि त्यामुळे सरकारी एजन्सीकडून या अ‍ॅप्सचे रिव्ह्यू केले जात आहे. एका अहवालानुसार, भारतात चिनी इंटरनेट कंपन्यांचे सुमारे ३०० कोटी युनिक युजर्स आहेत. हे अ‍ॅप्स कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय सुरक्षेसाठी किंवा लोकांच्या गोपनीयतेसाठी धोकादायक आहेत का? याबाबत सरकार एक यादी तयार करून, हे तपासत आहे. त्यामुळे या बंदी घातलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
------------------------------------------