Breaking News

विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचे ओझे कमी !

विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचे ओझे कमी

- कोरोनामुळे राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- शिक्षण विभागाने काढला अध्यादेश
मुंबई / विशेष प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबद्दलची माहिती एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोना संकट काळात विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या हेतूने अभ्यासक्रमात कपात करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. याबाबतचा अध्यादेश शिक्षण विभागाने काढला आहे.
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कपात झाल्यामुळे बहुतांश ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाला सामोरे जाणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शिक्षणमंत्री म्हणाल्या, की कोरोना संकटाच्या काळात आपण १५ जूनपासून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी विविध माध्यमांतून शिक्षणाचे मार्ग आपण सुरू केले आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा ताण विद्यार्थ्यांवर येऊ नये, त्यांनी कोणतंही दडपण घेऊ नये यासाठी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात २५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले. कपात करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक राज्य शैक्षणिक व संशोधक परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.