Breaking News

विधानसभा अध्यक्षांची याचिका फेटाळली, बंडखोर नेते सचिन पायलट यांना दिलासा !

विधानसभा अध्यक्षांची याचिका फेटाळली, बंडखोर नेते सचिन पायलट यांना दिलासा
- राज्यस्थानातील सत्तानाट्य
नवी दिल्ली/प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थानच्या राजकारणात अनेक घडामोडी मान-अपमानाचे नाट्य रंगल्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षांची मागणी फेटाळून लावली. या निर्णयानंतर उच्च न्यायालयातील सुनावणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे सचिन पायलट यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
राजस्थान काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकांना सचिन पायलट यांच्यासह त्यांचे १८ समर्थक आमदार गैरहजर राहिले. त्यांचे हे कृत्य पक्षविरोधी मानून पायलट यांच्यासह १८ आमदारांना विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी अपात्र ठरवण्याची नोटीस बजावली होती. त्याला पायलट गटाने राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि काँग्रेस सदस्य म्हणून मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. पायलट यांच्या याचिकेवर सुनावणी करताना राजस्थान उच्च न्यायालयाने १९ आमदारांच्या नोटिसीवर २४ जुलैपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यानंतर राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्याचसोबत सचिन पायलट समर्थक आमदारांनीही कॅव्हिट याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अरूण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठाने आदेश देताना अपात्रतेची नोटीस देण्यात आलेल्या काँग्रेस आमदारांच्या याचिकेवर राजस्थान उच्च न्यायालय निर्णय देऊ शकते, असे स्पष्ट केले. तसेच सी. पी. जोशी यांची मागणीही फेटाळली.