Breaking News

राम मंदिर भूमिपूजनाला विरोध !

राम मंदिर भूमिपूजनाला विरोध
- अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल
प्रयागराज/वृत्तसंस्था
अयोध्येतील राम मंदिर निर्मितीचे भूमिपूजन ५ ऑगस्टरोजी होणार आहे. मात्र या प्रस्तावित भूमिपूजनाला विरोध करण्याची मागणी करत एक याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल झाली आहे. हायकोर्टात एका पत्रकाराने ही याचिका दाखल केली असून, त्यात राममंदिराचे भूमिपूजन म्हणजे अनलॉक-२च्या गाईडलाईन्सचे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दिल्लीचे पत्रकार साकेत गोखले यांनी हायकोर्टात चीफ जस्टिस यांना लेटर पीआयएलच्या माध्यमातून ही याचिका केली आहे. गोखले यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, भूमिपूजन कोविड-१९ च्या अनलॉक-२ गाईडलाईन्सचे उल्लंघन आहे. अयोध्येमध्ये भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी ३०० लोकं एकत्रित होतील, जे कोविड-१९ च्या नियमांच्या विरोधी आहे. यात असेदेखील म्हटले आहे की, या कार्यक्रमामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. केंद्राच्या गाईडलाईन्समधून उत्तरप्रदेश सरकारला सूट मिळू शकत नाही. जर ही लेटर पिटीशन मंजूर झाली तर चीफ जस्टिस यांनी नियुक्त केलेल्या खंडपीठात या प्रकरणी सुनावणी होईल. या याचिकेत राममंदिर ट्रस्टसोबत केंद्र सरकारला देखील पक्षकार बनवले गेले आहे.
------------------------