Breaking News

दुध उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक, दूध रस्त्यावर ओतून निषेध !

दुध उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक, दूध रस्त्यावर ओतून निषेध

    नगर- पुणे महामार्गावरील म्हसणे फाटा येथे दुधाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे रस्त्यावर दुध ओतून शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध केला
----------
 बाजारभाव मिळत नसल्याने नगर- पुणे महामार्गावर दुध ओतून केला शासनाचा निषेध
            
  पारनेर प्रतिनिधी- 
       लॉकडाऊन च्या काळात २२ मार्च पासून दुधाचे बाजारभाव कमालीचे घसरले असून उत्पादीत केलेल्या दुधातून खर्चही भागत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मंगळवारी सकाळी दुध उत्पादक शेतकऱ्यांनी नगर- पुणे महामार्गावरील म्हसणे फाटा येथे रस्त्यावर दुध ओतून शासनाचा निषेध केला.
     शेतीला जोडधंदा म्हणून सुपा परीसरात शेतकऱ्यांच्या वतीने दुध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.तरूण वर्गाला नोकरी उपलब्ध होत नसल्यामुळे विविध बँकांचे कर्ज काढून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. मात्र गेल्या पाच महिन्यापासून दूधाला १८ ते २० रूपये प्रतिलिटर बाजार मिळत असल्याने जनावरांसाठी लागणारा खुराक शेंगदाणा पेंड, सरकी पेंड, मिल्क मोर, भुसा आदींचे बाजार भाव मात्र गगनाला भिडले आहेत.त्यात जनावरांसाठी लागणारा औषधांचा खर्च वेगळाच. उत्पादित केलेल्या दुधातून खर्चही भागत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.त्यात बँकांचे कर्ज कसे फेडायचे व कुटुंब कसे चालवायचे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
     शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दुधाला १८ ते २० रूपये प्रतिलिटर बाजार मिळत असून तेच दुध पुढे ५५ ते ६० रूपयांनी विकले जाते.यात फक्त शेतकरी भरडला जात असल्याने शासनाच्या वतीने याची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दुधाला ३५ रूपये प्रतिलिटर बाजारभाव मिळावा अशी मागणी यावेळी आंदोलन कर्ते शेतकऱ्यांनी केली आहे.या मागणीची दखल न घेतल्यास पुढिल काळात तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे.
     यावेळी पळवे ग्रामपंचायत सदस्य अनिल तरटे ,  विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेरमन सुदाम मगर, मारूती तरटे, मुकेश जाधव, अण्णा तरटे, रवी नवले,हरीभाऊ गाढवे,राजेंद्र पळसकर,निलेश पळसकर,अमोल पळसकर,मेजर विजय ठुबे,विजय नवले,मारुती तरटे, गणेश शिंदे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.