Breaking News

कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब!

कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब!

राज्य हादरले; लॅब टेक्निशियनला अटक

- अमरावतीतील घटना, महाराष्ट्रभर संताप
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २४ वर्षीय तरुणीच्या कोरोना चाचणीसाठी तिच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार अमरावतीमध्ये घडला. बडनेरा पोलिसांनी मंगळवारी (दि.२८) रात्री कोविड लॅबमध्ये टेक्निशिअन म्हणून काम करणार्‍या अल्पेश अशोक देशमुख (वय ३०) नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार, अ‍ॅट्रॉसिटी, आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही भयानक घटना गुरुवारी चव्हाट्यावर आली आणि राज्यभर संतापाची लाट उसळली.
संबंधित तरुणी अमरावतीमध्ये भावाकडे राहत असून, एका मॉलमध्ये नोकरी करते. मॉलमधील एका कर्मचार्‍याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे २८ जुलैरोजी ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये त्याच्या संपर्कातील २० जणांचे स्वॅब घेण्यात आले. हे सर्व स्वॅब नियमाप्रमाणे नाकाद्वारे घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणार्‍या अल्पेश देशमुखने तक्रारदार तरुणीला परत बोलावले आणि तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली असून, युरिनल तपासणी करावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर त्या टेक्निशियनने त्या युवतीला एका खोलीत नेऊन तिच्या योनीमार्गातून स्वॅब घेतला. एवढ्यावरच हा टेक्निशियन थांबला नाही तर त्याने त्या युवतीच्या मोबाईलवर मेसेजसुध्दा पाठविले होते. संबंधित फिर्यादी युवतीला संशय आल्याने तिने झालेला प्रकार आपल्या भावाला सांगितला. तेव्हा त्याने चौकशी केली असता अशा प्रकारे स्वॅब घेण्यात येत नाहीत, अशी माहिती मिळाली. म्हणून या २४ वर्षीय फिर्यादीने बडनेरा पोलिसात तक्रार नोंदविली. युवतीच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करून आरोपी अल्पेश याला अटक केली आहे, अशी माहिती बडनेराचे ठाणेदार पंजाब वंजारी यांनी दिली. आरोपी अल्पेशला ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
--
अशाप्रकारे स्वॅब घेणे हा अत्याचार : जिल्हाधिकारी
कोरोनाच्या चाचणीसाठी अशाप्रकारे स्वॅब घेतला जात नाही. हा अत्याचार आहे. याप्रकरणी लॅब टेक्निशियनविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.