Breaking News

चखालेवाडीच्या स्टोनक्रशर चालकावर गुन्हे दाखल करा, रामदास सुर्यवंशी यांनी निवेदन देवून केली मागणी !

चखालेवाडीच्या स्टोनक्रशर चालकावर गुन्हे दाखल करा, रामदास सुर्यवंशी यांनी निवेदन देवून केली मागणी
कर्जत/प्रतिनिधी :
माळढोक अभयारण्य कार्यक्षेत्रातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या ४०० मीटर परिसरात कर्जत तालुक्यातील चखालेवाडी येथील फाँरेस्ट वाटपाच्या गट नंबर ४६ मध्ये चालू असलेले अनधिकृत मोबाईल स्टोनक्रशर व सर्व यंत्रसामुग्री यांचे पंचनामे करून संबंधितांवर कायद्यातील तरतुदीनुसार तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी चांदे खुर्द येथील रामदास सुर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तहसीलदार तसेच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे,

माळढोक वन्यजीव अभयारण्याच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या ४०० मीटर परिसरात चखालेवाडी येथील फाँरेस्ट वाटपाच्या गट नंबर ४६ मध्ये शासनाची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या क्षमतेचे मोबाईल स्टोनक्रशर चालू आहे. हे स्टोनक्रेशर वनविभागापासून अंदाजे ८० ते १०० मीटर अंतरावर फाँरेस्ट वाटपाच्या गटांमध्ये राजरोसपणे चालू आहे. लाखो ब्रास बोगद्याच्या कामाचे मटेरियल क्रसिंग केले जात आहे. याच्या वाहतुकीसाठी सुमारे २० ते ३० दहा टायर हायवा, टिपर रात्रंदिवस चालू आहेत. त्यासाठी दोन- तीन पोकलेन मशीन चालू आहेत. क्रसिंग केलेले मटेरियल वाहतुकीसाठी लागणारा रस्ता हा वन विभागाच्या हद्दीतून जात आहे.

माळढोक अभयारण्याच्या संवेदनशील क्षेत्रात चालू असलेले हे अनधिकृत स्टोनक्रशर व तेथील हायवा, डंपर, पोकलेन मशीन बंद करून वन विभागाच्या नियमानुसार जप्त करावेत व कायद्यातील तरतुदीनुसार स्टोन क्रशर चालकावर, जागा मालकावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, त्यांच्याकडून नियमानुसार दंड वसूल करण्यात यावा. कारवाई करून तसे लेखी पत्र पुराव्यासह दोन दिवसात मला देण्यात यावे अन्यथा या प्रकरणी कोणतीही पूर्वसूचना न देता खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे सुर्यवंशी यांनी निवेदनात म्हटले आहे.