Breaking News

कर्जत तालुक्यात हृदयद्रावक घटना एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या !

कर्जत /प्रतिनिधी :
   मंगळवारी कर्जत तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. नागापूर येथील गणेश चंद्रकांत निंबोरे तर डोंबाळवाडी येथील साहेबराव तात्या शिंदे या शेतकऱ्याने आत्महत्या केली.
    कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने नागापूर येथील गणेश निंबोरे या युवा शेतकऱ्याने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी नऊ ते दहा वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या मागे वयोवृद्ध आई, पत्नी, तीन लहान मुली असा परिवार आहे. या अल्पभूधारक शेतकऱ्याला काही दिवसापूर्वी कांद्याने दगा दिला होता.
      बाजारात नेलेल्या कांद्याला दोन ते तीन रुपये भाव मिळाल्याने गणेश निंबोरे हा गेली काही दिवस आर्थिक विवंचनेमुळे तणावाखाली होता. घरची परिस्थिती हलाखीची, आईचे सततचे आजारपण, घरात तीन मुली अशा सर्व बाजूंनी अडचणी समोर दिसणाऱ्या या शेतकऱ्याने अखेरीस गळफास घेऊन या जगाचा निरोप घेतला.
      डोंबाळवाडी येथील साहेबराव तात्या शिंदे (वय : ६५) या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
त्याचे मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. 
      ते सकाळी आंघोळ करून शेतात गेले. काही वेळाने त्यांचे बंधू शेतात गेले असता त्यांना साहेबराव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत इतर लोकांना माहिती देवून मृतदेह खाली उतरवला. कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.