Breaking News

दहावीच्या निकालात मुलींचीच बाजी!


राज्याचा निकाल ९५.३० टक्के; कोकण विभाग अव्वल
- दहावीचा निकाल थेट १८ टक्क्यांनी वाढला


पुणे/विशेष प्रतिनिधी
राज्य शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा अर्थात इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर करण्यात आला असून, राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात १८.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली. राज्यात सर्वाधिक ९८.७७ टक्के निकाल कोकण विभागाचा लागला असून, सर्वात कमी ९२ टक्के निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. पुणे विभागाचा ९७.३४ टक्के तर मुंबई विभागातून ९६.७२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ९६.९१ टक्के मुली, तर ९३.९० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. 
यंदा निकाल हा थेट १८ टक्क्यांनी वाढला. हा निकाल वाढण्यामागचे नेमके कारण समोर आले. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही ठिकाणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळेच यावर्षी भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला. मुलांना त्या विषयाचे सरासरी गुण देण्यात आले आहेत. तसेच अंतर्गत मूल्यमापन, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी निकाल जास्त लागला. राज्यात फक्त ५ टक्के मुले नापास झाली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या व विभागीय मंडळाकडे जमा करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या. मात्र, कोरोनाच्या काळातही मंडळाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी व शिक्षकांनी निकाल तयार करण्याचे काम सुरू ठेवल्यामुळे २९ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर करणे शक्य झाले. दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्य मंडळातर्फे विद्यार्थांचा निकाल सर्वोत्तम पाच (बेस्ट ऑफ फाईव्ह) पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला. मागीलवर्षी मार्च २०१९ मध्ये ८०: २० पॅटर्न रद्द करून सर्व विषयांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे निकालाची टक्केवारी चांगलीच घसरली होती. परंतु, राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्य मंडळाने मार्च २०२० मध्ये पुन्हा ८० गुणांची लेखी व २० गुणांची तोंडी परीक्षा घेतल्यामुळे यंदा निकालात १८ टक्क्यांनी वाढ झाली. राज्यातील १५ लाख ८४ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील परीक्षेस प्रविष्ट झालेल्या १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थ्यांपैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

कोकण – ९८.७७ टक्के
पुणे – ९७.३४ टक्के
कोल्हापूर – ९७.६४ टक्के
मुंबई – ९६.७२ टक्के
अमरावती – ९५.१४ टक्के
नागपूर – ९३.८४ टक्के
नाशिक – ९३.७३ टक्के
लातूर – ९३.०९ टक्के
औरंगाबाद – ९२ टक्के