Breaking News

मोदी राष्ट्रपतीभवनावर, अर्धातास गोपनीय चर्चा

- लद्दाख दौर्‍यानंतर मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट


नवी दिल्ली/ विशेष प्रतिनिधी 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह, लद्दाखचा दौरा केल्यानंतर रविवारी सकाळी 11.30 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. मोदींनी राष्ट्रपती भवनात जाऊन ही भेट घेतली. देशासमोर असलेल्या महत्त्वपूर्ण आव्हानांवर 30 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. भारताच्या युद्धसज्जतेची माहितीही यावेळी राष्ट्रपतींना देण्यात आली.
गलवान खोर्‍यात झालेला भारत-चीन संघर्ष आणि त्यामुळे भारत-चीन सीमेवर असलेला तणाव, कोरोना, पाकिस्तानकडून होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन यासारख्या अनेक राष्ट्रीय घडामोडींवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या भारत-चीनमधील संबंध अत्यंत नाजून वळणावर आहेत. आपल्याला एकाच वेळी अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. देशांतर्गत आणि देशाबाहेरील समस्या उभ्या आहेत. आपण आव्हानांनाचा सामना निर्भीडपणे करत आहोत. या काळात आपण एकजुटीने राहाणे महत्त्वाचे आहे, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही ट्वीट करून नागरिकांना आवाहन केले आहे.
भारत आणि चीन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह-लडाखचा दौरा केला होता. यावेळी लष्करी अधिकारी आणि जवानांशी संवाद साधताना मोदींनी भारताच्या कणखरतेविषयी थेट शब्दांत संदेश दिला. ’विस्तारवाद्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे, हा इतिहास आहे,’ अशा थेट शब्दांत मोदींनी चीनवर निशाणा साधला. कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी ही अचानक भेट दिली होती.

चीन सीमेवरील तणावच चर्चेचा केंद्रबिंदूचीन आणि भारत यांच्यातील असलेल्या तणावपूर्ण संबंधांवर राष्ट्रपतींसोबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. भारत चीनच्या दादागिरीला आणि मुजोरीला उत्तर देण्यासाठी सर्वतोपरीने सज्ज आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वेगाने हलचाली सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.